कोरोना वाढण्याची विविध कारणे सांगितली जात आहेत. त्याच वेगवेगळ्या पातळ्यांवर विश्लेषण केले जात आहे. त्यात लक्षणे असताना खासगी डॉक्टरकडे बरेच दिवस उपचार केल्यानंतर कधीतरी मग तपासणी करायची तोपर्यंत मात्र, विलगीकरणाचे नियम मात्र, पाळायचे नाही हे एक कारण समोर आले होते. प्रशासकीय यंत्रणेच्याही हे निदर्शनास आले त्यामुळे याबाबत एक स्वतंत्र आदेशच काढण्यात आला. भितीपोटी तपासणी न करता उपचार सुरू ठेवणे किंवा हा कोरोना नसेल असा गैरसमज करून घेणे या दोन बाबी आपल्यासाठी व दुसऱ्यांसाठीही घातक ठरण्याची शक्यता आहे. आता याबाबत जागृती करणे गरजेचे, कोरोना बाबतची बेफीकीरी ही जीवावर बेतू शकते, अशी अनेक उदाहरणे समोर आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. ॲक्टीव केसेस दहा हजारांपर्यंत गेल्या आहेत. यात प्रशासकीय यंत्रणेची बेड मॅनेजमेंटच्या बाबतीत प्रचंड तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. एकीकडे बेडची संख्या अधिक दिसत असताना रुग्णांना मात्र थेट परत पाठविले जात असल्याचे प्रकार सुरू आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उपचारासाठी जागा नसल्याची एक वेगळीच दहशत जिल्ह्यात विशेषत: जळगावात निर्माण झाली आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिक परिस्थिती गंभीर आहे. डाॅक्टर आता हळू हळू रुजू होत आहे. कोरोनाने संपूर्ण रुग्णालयालाच विळखा घातला होता. प्रशासकीय यंत्रणेची अशी बिकट अवस्था असल्याने नागरिकांनी स्वत:च काळजी घेणे अशा परिस्थिीत अधिक महत्त्वाचे ठरते. कोरोनाची लक्षणे अगदी सर्वश्रृत आहे. ही लक्षणे जाणवल्या नंतर तातडीने तपासणी करून उपचारांना सुरूवात केल्यास गंभीर होण्याचा धोका टाळता येऊ शकतो, असे वारंवार सांगितले जाते. हे आपल्यासाठीच नव्हे तर दुसऱ्यांसाठीही सुरक्षीत असते. गेल्या महिनाभरात मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात कमी वयाचे मृत्यूही चिंता वाढविणारे आहे. यामागची कारणे म्हणजे उशीरा रुग्णालयात येणे, अन्य व्याधी असणे, आजार अंगावर काढणे, अशी काही कारणे डॉक्टरांच्या विश्लेषणातून समोर येत आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घे्ऊन नियम पाळणे व स्वत:ची काळजी स्वत: घेणे हेच कोरोनाला हरविण्याचे सध्यातरी एक शस्त्र आहे.
बेफीकीरी बेतू शकते जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:16 AM