आंबेडकरी साहित्य ठरले लेखनाची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:07 PM2018-03-10T12:07:44+5:302018-03-10T12:07:44+5:30
इयत्ता तिसरीत शिकत असताना मला वाचनाचं व्यसन जडलं. किराणा दुकानातून आणलेल्या वस्तूंसोबत असलेला कागद मी वाचल्याशिवाय बाजूला फेकत नसे. वाचनाच्या या व्यसनात भर पडली ती गल्लीत त्या काळी प्रौढ शिक्षण निरंतर कार्यक्रम सुरू झाल्यामुळे. या कार्यक्रमात प्रौढ वाचकांसाठी विविध विषयांवरील अनेक पुस्तके समाविष्ट असलेली लायब्ररी सुरू झाली होती. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत बराच कालावधी मिळत असे. याच कालावधीत लायब्ररीत मिळणारी अनेक विषयाची अनेक पुस्तके वाचली.
इयत्ता सातवी-आठवीत असताना वाचनाचं वेड शिगेला पोहोचलं. प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’ हे पुस्तक मित्राकडून एका दिवसासाठी मिळाले. घरी रॉकेलच्या चिमणीशिवाय प्रकाशाची दुसरी सोय नव्हती. रात्र सुरू झाल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंत हे पुस्तक आईवडिलांना वाचून दाखवत असताना आई-वडिलांसह अनेक वेळा रडलो. आई म्हणाली, ‘हे पुस्तक लिहिणारे लेखक आणि आपण समदु:खी आहोत.’ मलाही वाटायला लागले की, आपण जे जगलो, जे भोगले ते उजागर करावे. त्यासाठी त्या वेळी मला साहित्याचे प्रकार कळत नव्हते. पाठ्यपुस्तकातील सर्व कविता तोंडपाठ करायचो, एकटा असताना कविता गुणगुणायचो. त्यामुळे कविता जवळची वाटली. कविता हाच साहित्याचा आत्मा असतो. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंही आहे. कवी, साहित्यिक हे द्रष्टे असतात. लोकमतसह अनेक नियतकालिकांमधून कविता प्रकाशित झाल्या आहेत.
- डॉ.दिलीप लोखंडे