लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव आणि चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतला. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासंदर्भातील विस्तृत प्रकल्प आराखडा येत्या आठवड्यात सादर करण्याचे निर्देशदेखील देशमुख यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना दिले आहेत.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरू आहे. हे महाविद्यालय ६५० बेड आणि १५० विद्यार्थी संख्या यासह चिंचोली शिवारात ६७ एकरांच्या जागेत उभारण्याचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. त्यासाठीची जागादेखील निश्चित करण्यात आली आहे. त्याचा प्रकल्प आढावा संबंधित कंपनी नाशिक विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करणार आहे. त्याबाबत हे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
गेल्या सरकारच्या काळातच चिंचोली शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेडिकल हब उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातच तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र जागा असावी, यासाठी चिंचोली शिवारात उभारणी केली जाणार आहे. त्याचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. त्यासाठी नुकतीच आढावा बैठक पार पडली, अशी माहिती डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.