धार्मिक कार्यक्रम, सोहळे रद्द केल्यास तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:50+5:302021-07-14T04:18:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती भीषण होती. त्यामुळे राज्य शासनाने पंढरपूरची वारी रद्द केल्याच्या निर्णयाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती भीषण होती. त्यामुळे राज्य शासनाने पंढरपूरची वारी रद्द केल्याच्या निर्णयाला वारकऱ्यांनीदेखील समर्थन दिले होते. मात्र, आता कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. लसीकरणदेखील चांगल्या प्रकारे होत आहे. मात्र, तरीही शासनाने वारी रद्द करून राज्यभरातील वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. भविष्यात राज्य शासनाने जर धार्मिक कार्यक्रम, सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास त्या विरोधात वारकरी संप्रदायाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वारकरी संप्रदायाचे आळंदी येथील हभप नरहर चौधरी महाराज यांनी दिला आहे.
मंगळवारी पत्रकार भवनात याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी हभप भरत महाराज बेडीकर, दिनकर महाराज, अंकुश महाराज मनवेलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हभप नरहर महाराजांनी सांगितले की, राज्य शासनाने सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातली असती तर वारकरी संप्रदायाने राज्य शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला असता. मात्र, राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. निवडणुका घेतल्या जात आहेत. लग्न सोहळे थाटा-माटात पार पडत असताना, केवळ पंढरपूरची वारी बंद करण्याचा शासनाचा निर्णय अमान्य आहे. त्यामुळे राज्य शासनाचा वारकरी संप्रदायाकडून तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. तसेच पुढील काळात संतांचे सोहळे, समारंभ कोरोनाचे नाव सांगून रद्द करण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी दिला आहे.