बाजारात आला इराकी कांदा, घरगुती वापरात मात्र वांंधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:04 PM2020-01-02T12:04:59+5:302020-01-02T12:07:26+5:30

एका कांद्याचे वजन अर्धा ते पाऊण किलो

Iraqi onion came into the market, but only for domestic consumption | बाजारात आला इराकी कांदा, घरगुती वापरात मात्र वांंधा

बाजारात आला इराकी कांदा, घरगुती वापरात मात्र वांंधा

Next

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांच्या डोळ््यात पाणी आणणाऱ्या भारतीय कांद्याला पर्याय म्हणून इराकमधून कांद्याची आयात करण्यात आली असली तरी तो घरगुती ग्राहकांच्या पचनी पडलेला नाही. एकाच कांद्याचे वजन अर्धा ते पाऊण किलो असल्याने तो एकदा चिरला की पुन्हा वापरणे शक्य होत नसल्याने त्याची केवळ हॉटेल चालकांकडून खरेदी केली जात आहे. या इराकी कांद्याची किंमत ३० ते ४० रुपये प्रती किलो अर्थात निम्म्याने कमी असली तरी तो परवडणारा नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतीय कांद्यावरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागत आहे.
यंदा कांद्याचे भाव प्रचंड वाढून तो हॉटेलसह घरातीलही ताटातून कांदा गायब झाला आहे. ८० रुपये प्रती किलोवर पोहचलेल्या कांद्याने सर्वांच्या डोळ््यात पाणी आणले. देशभरात हीच स्थिती असल्याने दररोज स्वयंपाक घरातील आवश्यक घटक असलेल्या कांद्याने सर्वांचाच वांधा केला. देशातील कांद्याचे भाव नियंत्रणात यावे व सर्वांना कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारने इराकमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व इराकमधून कांद्याची आयात सुरू झाली.
जळगावात दररोज १०० ते १५० गोणी
देशात या इराकी कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर जळगावच्या बाजारपेठेतही तो दाखल झाला आहे. जळगावात दररोज या कांद्याच्या १०० ते १५० गोण्या (३५ ते ४० किलोची एक गोणी) येत आहेत. बाजार समितीमध्ये मात्र येणाºया फळ-भाज्यांमध्ये हा कांदा अद्याप लिलावासाठी आलेला नाही. बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातील अथवा मराठवाड्यातून येणाºया शेतकऱ्यांकडून फळ-भाज्यांची खरेदी केली जाते.
भाव जवळपास निम्म्याने कमी
बाजारात भारतीय कांदा ५० ते ८० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे तर इराक मधून आलेल्या कांद्याचे दर ३० ते ४० रुपये प्रती किलो आहेत. असे असले तरी या कांद्याची खरेदी घरगुती ग्राहकांकडून केली जात नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.
वजनाला भारी
इराकी कांदा खरेदी करायचा म्हटल्यास एका किलोमध्ये दोन ते तीनच कांदे बसतात. त्यामुळे तो खरेदी केला तरी घरी वापरणे शक्य होत नाही. कारण कांदा एकदा चिरला की तो लगेच वापरावा लागतो. त्यामुळे चिरलेला कांदा घरात ठेवताही येत नाही, पर्यायाने तो वायाच जातो. त्यामुळे कमी किंमतीत खरेदी करूनही तो न परवडणाराच ठरत आहे.

हा कांदा वजनामुळे न परवडणारा तर आहेच, सोबतच त्याची चवही भारतीय कांद्याच्या तोडीची नसल्याने त्याला घरगुती ग्राहकांकडून पसंती दिली जात नसल्याचे चित्र आहे.


हॉटेल चालक व इतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना भाजी तसेच खाद्य पदार्थांमध्ये कांद्याची ग्रेव्ही व मसाल्यासाठी कांदा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यामुळे त्यांनाच हा कांदा परवडणारा असल्याने त्यांच्याकडून या कांद्याची खरेदी केली जात आहे.
- नीलेश भोळे, भाजीपाला व्यावसायिक, जळगाव.

इराकचा कांदा बाजारात आला आहे. त्याचे भाव कमी असले तरी वजन जास्त असल्याने त्याची हॉटेल चालकांकडून खरेदी केली जात आहे. घरगुती ग्राहकांकडून मात्र त्यास पसंती नाही.
- प्रशांत माळी, कांदा व्यापारी, जळगाव.

Web Title: Iraqi onion came into the market, but only for domestic consumption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव