पारोळा : नदीजोड प्रकल्पा अंर्तगत भोंडण अँक्वेडक्ट ते लघुपाटबंधारे तलाव शिरसमनी कालवा तलावच्या पाटचाऱ्यांचे २० टक्के काम रेंगाळले आहे. हे काम पूर्ण व्हावे यासाठी माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते भोंडण शिरसमनी येथील प्रमुख ग्रामस्थ माजी संचालक मनोराज पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. यावेळी दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आहे त्यात या कामाला निधी ठेवतो, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. पारोळा येथील कार्यक्रम आटोपून ते पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्यावर भोंडण गावानजीक त्यांना थांबवून हे निवेदन देण्यात आले. १२ वर्षापासून हे काम रखडलेले आहे. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी त्यावेळी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविला होता. त्यांनी जामदा डाव्या कालव्याचे काम हाती घेऊन जिल्हा नियोजन अंतर्गत नदीजोड स्वतंत्र हेड निर्माण करून त्यावर निधी ठेवून या पाटचाऱ्यांचे ८० टक्के काम पूर्ण करून घेतले होते. शेतकऱ्यांनी या पाटचाऱ्यांसाठी स्वखुशीने स्वतःच्या शेतजमिनी दिल्या होत्या. या पाटचाऱ्यांना व कालव्याचे काम पूर्ण झाले, तर शिरसमनी, सुधाकर नगर, टिटवी, हनुमंतखेडे, चोरवड, भोंडण, पोपटनगर, टिटवी तांडा अशा आठ गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तरी या रखडलेल्या कामांना उर्वरित निधी तातडीने द्यावा, अशी मागणी मंत्री पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.
आठ गावांच्या पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 2:59 PM