जळगावात पेट्रोल-डिझेलची मागणी २५ टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:02+5:302021-06-01T04:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणारे दर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे प्रवासावर बंधने आल्याने पेट्रोल-डिझेलची मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणारे दर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे प्रवासावर बंधने आल्याने पेट्रोल-डिझेलची मागणी सरासरी २५ टक्क्यांनी घटली आहे. जानेवारी ते मे २०२१ यादरम्यानची मागणी पाहता निर्बंध लागू झाल्यानंतर ती कमी-कमी होत गेली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून वाहनाने बाहेर फिरायला जाणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर देखील बंधने आल्याने इंधनाची मागणी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात आणखी भर म्हणजे पेट्रोल-डिझेलचे वाढत जाणारे दर यामुळे देखील वाहनधारक वाहनांचा कमीत कमी वापर करीत बचत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे इंधनाची मागणी सरासरी २५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
जानेवारीमध्ये एका दिवसात २६०० ते २७०० लिटर पेट्रोलञी विक्री झाली, हे प्रमाण कमी होत जाऊन मे महिन्यामध्ये एका दिवसात २००० ते २१०० लिटरच्या जवळपास आले आहे. अशाच प्रकारे जानेवारी महिन्यात एका दिवसात १४०० ते १५०० लिटर डिझेलची विक्री होत होती, ती आता मे महिन्यामध्ये एका दिवसात ९०० ते १००० लिटरवर आली आहे.
सोमवारी पेट्रोलचे भाव १०१.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.२० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. ही भाववाढ पाहता पेट्रोल, डिझेलची मागणी काहीशी कमी होत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे विक्रीवर अधिक परिणाम झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या पाच महिन्यांतील पेट्रोल, डिझेलची विक्री पाहता त्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट झाली आहे. इंधनाचे वाढत जाणारे भाव तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध यामुळे मागणी घटली आहे.
- लक्ष्मीकांत चौधरी, पेट्रोल पंपचालक
कोरोनामुळे एकतर बाहेर फिरणे कमी झाले असून, त्यामुळे पेट्रोल कमी लागत आहे. तसेच भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता तर पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. वाहन वापरण्यापेक्षा जी कामे पायी जाऊन होणार आहेत ती पायी जाऊनच करीत असून, वाहनाचा कमीत कमी वापर केला जात आहे.
- राजेश महाजन, वाहनचालक.