जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसानभरपाई अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे ३६ टक्के वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:09 PM2019-11-28T12:09:48+5:302019-11-28T12:10:19+5:30
भुसावळ व बोदवडमध्ये १०० टक्के वाटप
जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या १७९ कोटी ९८ लाखांच्या पहिल्या हप्त्याच्या रक्कमेपैकी ५७ कोटी २ लाख १२ हजार ७२३ इतक्या रक्कमेचे म्हणजेच ३६.५४ टक्के वाटप बँकांमार्फत झाले आहे. त्यात भुसावळ व बोदवड तालुक्यांचे १०० टक्के अनुदान वाटप झाले आहे. तर जळगाव, एरंडोल व मुक्ताईनगर तालुक्यात शून्य टक्के वाटप झाले आहे.
जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने कृषी विभाग, महसूल व जि.प.ला दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातही पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात आले. तसेच या नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत केला असून जिल्हा प्रशासनाने हा निधी तालुकानिहाय २८ टक्के प्रमाणे वितरीत केला आहे. त्याचे वाटप बँकांमार्फत सुरू आहे.
केंद्र शासनाकडूनही मदतीची मागणी करण्यात आली असून केंद्र शासनाची समितीही २२ व २३ नोव्हेंबर रोजी पाहणी करून गेली आहे.
केंद्र शासनाने पहिला हप्ताही जाहीर केला असला तरीही त्याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
मदत वाटप करावयाच्या एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या- ६ लाख ४१ हजार ३४५
वितरीत निधी- १७९ कोटी ९८ लाख १ हजार
वाटप वितरीत झालेले शेतकरी २ लाख ५४ हजार ७४६
वितरीत अनुदान- ५७ कोटी ०२ लाख, १२ हजार ७२३
टक्केवारी- ३६.५४ टक्के
४६३ कोटी ६६ लाख निधीची अद्याप प्रतीक्षा