जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे म्हणतात... ‘संस्कारक्षम पिढीसाठी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:26 AM2020-02-24T01:26:18+5:302020-02-24T01:26:40+5:30
मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत मराठी भाषेसंदर्भात आपली मतं मांडताहेत जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे...
प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास ते आत्मसाद करणे सहज शक्य होते. योग्य पद्धतीने शिक्षण आत्मसाद झाले तर पिढीदेखील संस्कारक्षम घडते. यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या पाल्यांना मातृभाषेतूनच अर्थात मराठीतूनच शिक्षण देत संस्कारक्षम पिढी घडविण्यास हातभार लावणे गरजेचे आहे, असा सल्ला पाटी-पेन्सीलवर प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवून जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचलेले जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिला.
मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, मराठी ही संस्काराची भाषा आहे. आज अनेक शोध लागून विज्ञान व इतर विषय वेगवेगळ््या भाषांमध्ये आले तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने मराठीमध्ये साहित्य संपदा आहे. ही साहित्य संपदा समृद्ध असून, तिचा वापर व वाचन मोठ्या प्रमाणात झाल्यास मराठीची महिमा आपसूचक सर्वांना समजेल व मराठीतून शिक्षण घेऊन व्यक्ती कोठे पोहचू शकतो, हेदेखील त्यातून लक्षात येईल.
दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण आवश्यक
अहमदनगर जिल्ह्यातील जवळवाडी, ता.पाथर्डी येथे पाटी-पेन्सील हाती घेऊन प्राथमिक शिक्षण घेतले ते मराठीतूनच. त्यानंतर पाथर्डी येथे माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरविल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व मुंबई येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि त्यात यशस्वीही झालो. या सर्व प्रवासात शिक्षणाचा पाया होता तो मराठीतूनच. त्यामुळेच मी सहज कोणतेही ज्ञान आत्मसाद करू शकलो, असे स्पष्ट मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आज इंग्रजीचा एवढा प्रचार वाढला की, मराठी शाळा ओस पडत आहे. याला कोठेतरी आळा बसला पाहिजे.
मराठीचा प्रचार झाला असता तर इंग्रजीची गरज पडली नसती
आज सर्वत्र इंग्रजीचे भूत दिसत आहे. इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे, हे मान्य आहे. मात्र यात आपल्याही मराठी भाषेचा विसर पडून चालणार नाही. इंग्रजीचा मोठा प्रचार झाल्याने ती सर्वत्र पोहचली. मात्र मराठीच्या बाबतीत तसे झाले नाही. तिचा प्रचार झाला असता तर इंग्रजीची गरजच पडली नसती, असे डॉ.ढाकणे म्हणाले. याचे उदाहरण म्हणजे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण इंग्रजीतून घेतले जाते. मात्र आज आयुर्वेदीक, युनानीनेदेखील आपापली भाषा जोपसली तरी हे शास्त्रही पुढे गेले आहे.
मातृभाषांचा वापर करून साधली प्रगती
आज जर्मनी,जपान यांच्यासह युरोपातील अनेक छोट्या-छोट्या देशांनी आपापल्या भाषांचाच वापर करीत मोठी प्रगती साधली आहे.
मातृभाषेचा अभिमान बाळगा
प्रवाहासोबत चालणे आवश्यक असल्याने प्रत्येकजण इंग्रजीच्या मागे धावत आहे. ज्ञानासाठी ते आवश्यक आहे. मात्र आपल्या मूळ भाषेलाच मागे सारूनही चालणार नाही. यासाठी मराठीचा प्रचार, प्रसार होण्यासाठी प्रत्येक घरात आई-वडिलांनी पुढाकार घेत आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी मराठी शाळेतच पाठविले पाहिजे, असा आग्रहाचा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिला. आज अनेक जण जर्मन, फ्रेंच व इतर भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आपल्याकडील संस्कृत, उर्दू भाषा का शिकत नाही, असा सवालही त्यांनी मातृभाषेबद्दल उपस्थित केला.
(शब्दांकन - विजयकुमार सैतवाल)