जळगाव जिल्हा रुग्णालयात साडेपाच लाखाचे ‘व्हेंटिलेटर’ धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:42 PM2018-07-10T12:42:20+5:302018-07-10T12:43:14+5:30
जळीत कक्षातील निम्म्याहून अधिक ‘एसी’ बंद
जळगाव : कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणेचा (सेंट्रल आॅक्सिजन) अभाव असलेल्या जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टने कृत्रिम श्वासोश्वास यंत्र (व्हेंटिलेटर) उपलब्ध करून दिल्यानंतर ते बसविण्यातच न आल्याने गेल्या सहा वर्षांपासून ते धुळखात पडून आहे. यंत्र असूनही उपयोग होत नसल्याने नागरिकांना विनाकारण भूर्दंड सहन करावा लागत आहे. या सोबतच सोनोग्राफी मशिन अद्यापही सुरू झाले नसून जळीत कक्षातील निम्म्याहून अधिक वातानुकुलीत यंत्रणा (एसी) बंद आहेत. जिल्हा रुग्णालयातील यंत्र सामुग्रीला लागलेल्या या ‘आजारा’वर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या न कोणत्या समस्या उद्भवलेल्या असतात. त्यामुळे त्याचा रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे आताही यंत्रसामुग्रीअभावी रुग्णांचे हाल होत आहे.
कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा नाही
दररोज जिल्ह्यातील २० ते २२ गर्भवती महिलांची जिल्हा रुग्णालयात प्रसूती होते. त्यांची प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकांवर आवश्यक उपचारासाठी नवजात शिशू कक्ष आहे. मात्र या ठिकाणी कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा नसल्याने बालकांना त्याची गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात हलवावे लागते. यामुळे सामान्य जनतेला बऱ्याचवेळा लाखो रुपयांचाही भूर्दंड सहन करावा लागतो. यावर उपाययोजना होणे गरजेचे असले तरी त्याकडे शासनस्तरावरून दुर्लक्ष होत आहे.
‘रोटरी वेस्ट’ने दिली साडेबारा लाखाची मशिनरी
जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा(सेंट्रल आॅक्सिजन) नसल्याने या ठिकाणी २०१२मध्ये रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्टने पुढाकार घेत तत्कालीन अध्यक्ष डॉ. राजेश पाटील. गनी मेमन यांच्यासह पदाधिकाºयांनी साडे बारा लाखाची मशिनरी उपलब्ध करून दिली. रोटरी क्लब आॅफ कल्व्हर सिटी कॅलिफोर्निया (अमेरिका) यांच्या मदतीने रोटरी मॅचिंग ग्रॅण्ड अंतर्गत चार नवजात बालकांची अद्यायावत व्यवस्था होऊ शकेल असे जीवरक्षक यंत्र (वॉर्मर), ह्रदयाचे ठोके मोजण्याचे मशिन, सलाईन देण्याचा पंप, कावीळ कमी करण्याचा लाईट (फोटो थेरपी), नवजात शिशू सेक्शन मशिन (अन्न व श्वास नलिकेच्या स्वच्छतेसाठी) आणि कृत्रिम श्वासोश्वास यंत्र (व्हेंटिलेटर) असे एकूण साडे बारा लाखाची मशिनरी येथे दिली. विशेष म्हणजे यासाठी रोटरीचे अमेरिकेतील पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
‘व्हेंटिलेटर’ बसविले गेलेच नाही
रोटरीने दिलेल्या या मशिनरीतील व्हेंटिलेटरचीच किंमत साडे पाच लाख रुपये आहे. नवजात कक्षात कृत्रिम श्वासोश्वास यंत्रणा नाही व रोटरीकडून किमान एक यंत्र मिळाले तरीदेखील ते जिल्हा रुग्णालयात बसविले गेले नाही. त्यामुळे काही दिवसांनी ते बसविण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचे काही सुटे भाग (पार्ट) खराब झाल्याने ते मिळू शकले नाही. त्यामुळे हे यंत्र आजही बंद अवस्थेतच आहे.
नागरिकांना भूर्दंड
व्हेंटिलेटरअभावी या ठिकाणी जन्मलेल्या बालकांना गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे नागरिकांना भूर्दंड सहन करावा लागतो. अशाच प्रकारे दोन आठवड्यापूर्वी एका नवजात बालकास खाजगी रुग्णालयात हलविले असता दोन लाखाचा खर्च आला होता. आर्थिक झळ बसण्यासह बºयाचवेळा आॅक्सिजन अभावी नवजात बालकांच्या जीवावरदेखील बेतते.
जळीत कक्षात गैरसोय
जळीत कक्षातही रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणच्या १० पैकी सात एसी बंद असल्याने येथे जळीत रुग्ण आणल्यानंतर त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ््यामध्ये तर रुग्णांना अधिक गैरसोयीच्या झळा बसतात.
सोनोग्राफी बंद
जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांची आर्थिक स्थिती बिकट असते. त्यात आता सोनोग्राफी होत नसल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. वेळेवर सोनोग्राफी झाले नाही तर गंभीर प्रसंग ओढावू शकतो, अशी भीती रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रसूती कक्षामध्येदेखील वैद्यकीय अधिकाºयांच्या कमतरतेमुळे अडचणी येतात. त्यामुळे ‘सिझर’साठी त्यांना औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागते. त्यामुळे पुरेस्या स्त्री रोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.
तांत्रिक बिघाडामुळे सोनोग्राफी मशिन बंद आहे. या बाबत तंत्रज्ञास कळविले आहे.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता.
नवजात शिशू कक्षात मिळालेले व्हेंटिलेटर हे त्या वेळी बसविले गेले नाही. मी आल्यानंतर बसविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे काही पार्ट मिळत नव्हते. आता ते आॅक्सिजनच्या नॉर्मल सिलिंडरवर चालविले तर ते चालू शकणार नाही.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक