जळगाव : तालुक्यातील जळगाव खुर्द येथील शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, रविवारी रात्री बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जळगाव खुर्द परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा संचार असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. याआधीदेखील या भागात बिबट्याने एका मोकाट कुत्र्याचा फडशा पाडला होता. रविवारी एका वासराचा फडशा पाडल्यानंतर वनविभागाकडून या परिसरात पाहणी करण्यात आली. तसेच बिबट्याचा पगमार्कदेखील तपासण्यात आले. वनविभागाचा कर्मचाऱ्यांचा पाहणी दरम्यान बिबट्याचे पगमार्क वगैरे आतापर्यंत आढळून आले नसले, तरी वासरा वर झालेल्या हल्ल्यावरून हा हल्ला बिबट्या नेच केला असल्याची शक्यता वनविभागातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या शोधात अनेक वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळत असतात. नशिराबाद शिवार परिसरात याआधीदेखील बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या भागाकडूनच इतर बिबट गावांकडे आले असावे, अशी शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे.