एकनाथ खडसेंच्या संपत्तीची चौकशी करा, आमदार सुरेश भोळेंच्या लेटरहेडवरुन कोर्टाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 02:30 PM2018-07-15T14:30:05+5:302018-07-15T14:30:50+5:30
एकनाथ खडसे यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशा आशयाची तक्रार आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे.
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा बेहिशेबी मालमत्ता आहे, त्याशिवाय कन्या रोहिणी खडसे-खेवलकर चेअरमन असलेल्या जिल्हा बॅँकेतून खडसे यांनी कोट्यवधीच्या नोटा बदल केल्या आहेत. याची सीबीआय चौकशीही करण्यात आली आहे, अशा आशयाची तक्रार आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, आपली बदनामी करण्याच्या हेतूने कोणीतरी हा प्रकार केल्याचे आमदार भोळे यांनी म्हटले असून त्याबाबत शनिवारी सायंकाळी त्यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कराळे यांनीही भोळे यांचे पत्र मिळाल्याची माहिती ‘लोकमत’ ला दिली.
काय आहे खडसेंविरुद्ध तक्रार?
खडसे यांचा मूळ व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आहे. याबाबत समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. ताहिलरामानी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. खडसेंच्या कन्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतून कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली असून ती दाबण्यात आली, असेही पत्रात म्हटले आहे. भोळे यांची हुबेहूब स्वाक्षरी या पत्रावर आहे. त्याच्यावर जावक क्रमांक मात्र नमूद करण्यात आलेला नाही.
खडसे आमचे नेते व गुरुही आहेत. आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने कुणीतरी हे कृत्य केले आहे. पक्षाच्या प्रदेश कमिटीने मला याची माहिती दिली. त्यामुळे मी तत्काळ प्रदेशाध्यक्ष व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्र देऊन चौकशीची मागणी केली.
-सुरेश भोळे, आमदार
आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी पत्र दिले. खडसे यांच्याविरुद्ध भोळे यांच्या लेटरहेडवर खोटी तक्रार केल्याचे म्हटले आहे. अशा प्रकरणात आपला सहभाग नाही व त्यावर लक्ष ठेवावे म्हणून त्यांनी विनंती केली आहे.
- दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक