लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरदेखील दहिहंडी उत्सव साजरा करण्यावर घालण्यात आलेल्या बंदीचा निषेध करत, मंगळवारी मनसेने प्रशासन, शासन व पोलिसांचा विरोध झुगारून शहरातील शिवतीर्थ मैदान परिसराजवळ दहिहंडी फोडली आहे. तसेच राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करत, हिंदू सणांवर घालण्यात आलेल्या बंदीचा निषेध केला आहे.
जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, मनसे तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे यांच्या नेतृत्वात सरकारच्या निषेधाची दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, तुषार पाठक, राहुल माळी, कुणाल पाटील, कुणाल पवार, धनंजय चौधरी, महेश माळी, आशिष सपकाळे, गोरख जाधव, लोकेश अहिरे, संतोष सुरवाडे, विशाल कुमावत, अविनाश जोशी, नाना वानखेडे, जितू बऱ्हाटे, अमोल माळी, सागर पाटील, हर्षल निकम, महेश सोनवणे, मनोज खुळे, स्वप्नील चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्मित चौधरी, हर्षल निकम, तेजस रोटे या लहान बाळकृष्णांनी दहिहंडी फोडली.
राज्य सरकारची तुलना ‘कंस मामा’शी
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट संपल्यावरसुद्धा महाराष्ट्रातील आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही व इतर पक्षांचे हजारोंच्या वर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात; परंतु हिंदूंचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच राज्य सरकारची तुलना ‘कंस मामा’शी केली.
पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा
दहिहंडी उत्सव साजरा करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नाही. मात्र, तरीही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाची परवानगी न घेताच उत्सव साजरा केल्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.