जळगाव महापालिका निवडणूक : काळे परिवाराची तिसरी पिढी राजकारणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:41 AM2018-07-14T11:41:25+5:302018-07-14T11:42:28+5:30
राजकारणातील कुटुंब
जळगाव : शेती हा पारंपरिक व्यवसाय असलेल्या जुने जळगाव भागातील मूळचे रहिवासी व माजी नगराध्यक्ष पांडूरंग उर्फ बंडू काळे यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात नशिब आजमावत आहे. या निवडणुकीत काळे कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जुने जळगावातील रहिवासी असलेले रघुनाथ सोमा काळे यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय. १९४० मध्ये त्यांनी युवक काँग्रेसचे काम सुरु केले. त्यानंतर जळगाव फ्रुटसेल सोसायटीचे सलग १५ वर्ष चेअरमन राहिले. १९६७ मध्ये त्यांनी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्यानंतर काळे कुटुंबातील सदस्य व माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांनी रमेश पंडीत चौधरी यांच्या विरोधात १९७४ मध्ये पहिली निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या ६३ मतांनी पराभव झाला. त्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरु केला. १९८५ ते १९९५ या दरम्यान ते स्वीकृत नगरसेवक म्हणून होते. त्यानंतर १९९५ ते २००८ या कालावधीत बंडू काळे व त्यांच्या पत्नी सुधा काळे या विजयी झाल्या. २००८ मध्ये राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत काळे दाम्पत्य पराभूत झाले. त्यानंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली. त्यांचे पुतणे मनोज काळे हे २००३ ते २००८ या दरम्यान नगरसेवक म्हणून राहिले.
२०१३ मध्ये त्यांच्या सुन दिपमाला काळे व मुलगी डॉ.पुनम काळे-येवले यांनी निवडणूक लढविली. सुन दिपमाला काळे या विजयी झाल्या तर डॉ.पुनम काळे या अवघ्या ६३ मतांनी पराभूत झाल्या. या निवडणुकीत काळे परिवारातील तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यात प्रभाग ७ ब मधून दिपमाला काळे निवडणूक लढवित आहेत.
बंडू काळे यांचे चिरंजीव अमित काळे हे प्रभाग ६ मधून तर त्यांचे दुसरे चिरंजीव पंकज काळे हे प्रभाग ६ ड मधून निवडणूक लढवित आहेत.
अमित हे यांनी व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेतली आहे. त्यासोबतच बीबीएम देखील केले आहे. पंकज काळे यांनी व्यवस्थापन शास्त्र व त्यासोबत एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील ते करीत आहेत.