जळगाव महापालिका निवडणूक पावसाळी अधिवेशनात : ते तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:33 PM2018-07-15T12:33:13+5:302018-07-15T12:34:09+5:30
अजित पवार यांची टीका
जळगाव : महापालिका निवडणुकीतील पक्षांतराचा मुद्दा लक्षवेधी ठरत आहे. अन्य पक्षातील उमेदवार भाजपाकडून मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आल्याने भाजपातील निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे. आयाराम गयाराम हे तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात केला.
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून मनसे, राष्टÑवादीसह अन्य पक्षातील उमेदवारांना आयात करुन त्यांना उमेदवारी देण्यात आली. याबाबत अजित पवार यांनी अधिवेशनात भाजपावर सडकून टीका केली. याबाबतचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, या व्हिडिओबाबत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना विचारला केली असता अजितदादा यांच्या भाषणाचा व्हिडिओ मी सुद्धा बघितला. तर आमदार डॉ.सतीश पाटील यांनी आपण हा व्हिडिओ पाहिला नसल्याचे सांगितले.
भाजपा समर्थकांकडून उत्तर
अजित पवार यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर ‘साळसूदपणाचा कहर ’ या आशयाची पोस्ट व्हायरल झाली आहे. राजकीय फोडाफोडीच्या संस्कृतीत हातखंडा असणाऱ्या पवार घराण्याने राजकीय आयात-निर्यात या विषयावर बोलणे म्हणजे गणिकेने सतीच्या वाणाबद्दल बोलण्यासारखे असल्याचा पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण, राजकीय आयपीएलची भन्नाट कल्पना यावर भाष्य केले आहे.
आमची घेऊन, पोटं तुमची मोठी व्हायला लागली....
अधिवेशनात अजित पवार यांनी शेलक्या शैलीत भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडले. ते त्यांच्याच शब्दात....जनतेचा विश्वास उडाल्याने भंडारा व गोंदियामध्ये तुमचा (भाजपाचा) ५० हजाराने पराभव झाला. बाकीच्या ठिकाणी देखील तशीच स्थिती आहे. ठिक आहे आता गिरीश महाजन साहेब आले जळगाववरून. तुम्ही काय करतात, तुमच्याकडे नाही उमेदवार, ये मनसेमधनं, ये राष्ट्रवादीतनं, ये काँग्रेसमधनं, अहो पण तुमची आहेत ती तशीच राहिली ना. आमची घेऊन पोटं तुमची मोठी व्हायला लागली. ती पोटं फुटायला लागली. आमच्यातून जे गेले ना, ते तुमचे नाही आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे आहेत. सत्ता येऊ द्या. यांच्यातली गेलेली नाही सर्व परत आली तर नावाचा अजित पवार नाही. मात्र जी मागची आहेत ना, ती कायम तुमची राहणार आहेत. हे कायम लक्षात ठेवा.
सोशल मीडियावर पेटले राजकीय युद्ध
अजित पवार यांचा नागपूर अधिवेशनातील व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडीयावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय कार्यकाळातील फोडाफोडीचे राजकारण व त्यातून उभा राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमान यावर विवेचन करण्यात आले आहे. जळगाव शहरातील विविध व्हॉटस् अप ग्रुप व फेसबुकवर हा व्हीडिओ तसेच सोशल मिडीयावरील पोस्ट व्हायरल होत आहे.
आमचा व आपल्या अपेक्षांचा भंग झाला : अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ
जळगाव शहरात कालपासून आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो अत्यंत हृदयस्पर्शी आहे. आपण आम्हाला बहुमत दिले. आम्ही शहराच्या विकासासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली रक्कम, । गाळ्यांचा प्रश्न, हुडकोचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र यश मिळाले नाही. आमच्या व आपल्या अपेक्षांचा भंग झाला. आता मनपा निवडणुकीत युती व्हावी व शहराच्या विकासाला गती मिळावी यासाठी युतीचा प्रस्ताव दिला. त्यासाठी प्रतिसादाची वाट पाहिली मात्र प्रतिसाद मिळाला नाही. ते भूलभूलय्यांचा खेळ खेळत राहिले. सभोवताली काय घडते आहे, आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, असा या व्हिडिओतील मजकूर आहे.