जळगाव महापालिका निवडणूक : ढंढोरे कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 02:16 PM2018-07-19T14:16:10+5:302018-07-19T14:19:20+5:30
नगरपालिका व आताची महानगरपालिका आणि ढंढोरे कुटुंब असे समिकरण तयार झाले आहे. शनीपेठ भागातून सलग २७ वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आहे.
जळगाव : तत्कालिन नगरपालिका व आताची महानगरपालिका आणि ढंढोरे कुटुंब असे समिकरण तयार झाले आहे. शनीपेठ भागातून सलग २७ वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात आहे.
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगावच्या राजकारणात सर्व जाती व धर्माच्या व्यक्तींचा समावेश करून घेत जळगावच्या विकासासाठी प्रयत्न केले. यामध्ये माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे हे सुरुवातीपासून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक राहिले आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय प्रवास
शिवचरण ढंढोरे यांचे वडील कन्हैय्यालाल ढंढोरे हे मुळचे काँग्रेसच्या विचारांचे. तर त्यांचे काका कॉ.सुकदेवराव ढंढोरे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे. दोन्ही बंधूंनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्याला १९४७ पासून सुरुवात केली. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ढंढोरे कुटुंबातील दोन्ही भावांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या दरम्यान समाजाचे प्रमुख म्हणून काही काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली.
१९८५ मध्ये नगरपालिकेत प्रतिनिधीत्व
वडिलांकडून राजकारणाचा वारसा प्राप्त झाल्यामुळे १९८३ मध्ये शिवचरण ढंढोरे यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली. त्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या पॅनलचे उमेदवार रमेश भुसर यांचा पराभव करीत नगरपालिकेत प्रतिनिधीत्व केले.
पहिल्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर तब्बल २७ वर्षे या कुटुंबाकडे या प्रभागाचे प्रतिनिधीत्व राहिले. २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मात्र ढंढोरे कुटुंबातील कुणीही सदस्य नव्हते. या निवडणुकीत मात्र प्रभाग ४ अ मधून ते शिवसेनेचे उमेदवार आहेत.
तिन्ही महिलांना नगरसेवकपदाची संधी
माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातून त्यांची आई जानकाबाई ढंढोरे व पत्नी शशीबाई ढंढोरे या नगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. तर सून रंजिता अनुपसिंग ढंढोरे या २००३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. ढंढोरे कुटुंबातील तीन महिलांना नगरसेवकपदाचा मान मिळाला.
नगराध्यक्षपदासह विविध पदांवर काम
शिवचरण ढंढोरे यांनी १९९५ मध्ये उपनगराध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर २००३ मध्ये नगराध्यक्षपदाची तर त्यानंतर मनपा आरोग्य सभापती, दीक्षा भूमी सभापती या जबाबदारी पार पाडल्या आहेत.