Jalgaon: चांदीला चकाकी, आठवडाभरात ३३०० रुपयांची वाढ, सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार
By विजय.सैतवाल | Published: August 26, 2023 05:52 PM2023-08-26T17:52:40+5:302023-08-26T17:55:23+5:30
Jalgaon: गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयादरम्यान असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होत जाऊन आठवडाभरात ती तीन हजार ३०० रुपयांनी वधारली आहे.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयादरम्यान असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होत जाऊन आठवडाभरात ती तीन हजार ३०० रुपयांनी वधारली आहे. त्यामुळे चांदीचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू असून ते पुन्हा ५९ हजार रुपयांच्या पुढे जात ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
अधिक मास सुरू झाल्यानंतर सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र अधिक महिना संपताच त्यांचे भाव कमी झाले. चांदीचे भाव तर ७ ऑगस्टपासूनच कमी होत जाऊन ते ७० हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यात एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ७१ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. त्यानंतर किरकोळ चढ-उतार होत राहिला. मात्र २२ ऑगस्ट रोजी चांदीत थेट एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली व ती ७२ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहचली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ४०० रुपयांची वाढ झाली. तसेच २४ ऑगस्ट रोजी पुन्हा एक हजार ४०० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे भाव ७४ हजार ४०० रुपये प्रति किलो झाले. २५ ऑगस्ट रोजी ४०० रुपयांची घसरण झाली मात्र २६ ऑगस्ट रोजी पुन्हा ३०० रुपयांची वाढ झाल्याने ती ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
दुसरीकडे मात्र सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू आहे. गेल्या आठवड्यात सोने ५९ हजार रुपयांच्या खाली येऊन ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाले होते. मात्र २२ रोजी त्यात २०० रुपयांची वाढ झाली. तसेच २४ ऑगस्ट रोजी पुन्हा १०० रुपयांची वाढ होऊन ते ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तीन दिवसांपासून सोने याच भावावर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने चांदीच्या भावात वाढ झाली असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.