जळगाव : भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तिरंगी तर नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात आहेत. एकनाथ खडसे यांचा हा मतदार संघ असल्याने जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिवसेना- राष्ट्रवादी अशी आघाडी आहे.
एकूण 23 हजार 726 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी (महिला) राखीव आहे. यासाठी भाजपाच्या नजमा इरफान तडवी, शिवसेनेच्या ज्योती दिलीप तायडे आणि काँग्रेसच्या माधुरी आत्माराम जाधव यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
भाजपाने सर्वच्या सर्व म्हणजे 17 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर शिवसेनेच्यावतीने 13, काँग्रेस 7 तर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 3 जागा लढवित आहे. पक्षाच्या चिन्हावर प्रथमच निवडणूक लढविली जात आहे.
असे आहेत उमेदवार एकूण जागा-17भाजप- 17शिवसेना-13राष्ट्रवादी काँग्रेस- 3काँग्रेस- 7भारिप बहुजन महासंघ-4अपक्ष-29