जळगाव जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची शक्यता धूसूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:35 PM2019-12-26T12:35:28+5:302019-12-26T12:36:38+5:30
मंत्रिमंडळ विस्तार विलंब भाजपच्या पथ्यावर
जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची ३ रोजी निवड होत आहे. यासाठी राज्याप्रमाणेच महाआघाडीचा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी आकड्याचे गणित पाहता महाआघाडीची शक्यता धूसूर असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार अनिल आहेर (नांदगाव, नाशिक) हे गुरुवारी सायंकाळी जळगावात येत आहेत. त्यांच्या उपस्थिीत पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. यानंतर पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती मिळाली.
राजकीय खेळी पण..
जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या़ मात्र, निवडीचा कार्यक्रम स्थगित होणे व पुन्हा मुदतवाढ मिळणे हे सत्ताधाऱ्यांच्या पथ्थ्यावर आहे़ यामुळे इच्छुकांचा हिरमोड होऊन राजकीय खेळ्या मंदावल्या आहे़ आता बदल अशक्य या भूमिकेतून सदस्यही राजकीय गणितांपेक्षा मंजूरीच्या कामांच्या वर्कआॅर्डर काढण्याच्या धावपळीत असल्याचे चित्र आहे़
राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडील प्रत्येकी एक सदस्य अपात्र आहेत. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना बहुमतासाठी ३३ ही संख्या गाठता येणे शक्य नाही, अशी स्थिती आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने महाविकास आघाडीची आशा धूसर तर भाजप एक हाती बहुमत मिळवू शकते, अशी स्थिती आहे. २ सदस्य अपात्र झाल्याने ६७ ची संख्या ६५ झाली आहे. त्यामुळे बहुमतासाठी ३३ सदस्य हवे आहेत. ही संख्या भाजपाजवळ आहे, तरीही काँग्रेसला सोबत घेऊन ते एक पद देतील. अध्यक्षपदासाठी पक्ष पातळीवरून कोणते नाव येते यावर बरेच काही अवलंबून आहे. पल्लवी सावकारे यांच्या नावासाठी बरेच सदस्य आग्रही आहेत. मधू काटे हे उपाध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत. त्यांना संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे, काँग्रेसला महाविकास आघाडी होणार नाही हे गणित माहीत असल्याने ते कमी कष्टाने मिळणारे एक सभापतीपद सोडतील असे वाटत नाही, ते भाजपसोबतच राहतील असा अंदाज आहे, एकनाथराव खडसे यांना मानणारा गट फुटणे आता जवळपास अशक्यच वाटते कारण त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. शिवाय केवळ आठच दिवस हाती असल्याने काही मोठा राजकीय भूकंप होण्याची स्थिती नाही,
संख्यांचे गणितच जमत नसल्याने महाविकास आघाडीतील पक्षांची पक्की मानसिकता असल्याने पुढाकार कोणी घेणार नाही व भाजप अगदी सहज अध्यक्ष निवडीची परीक्षा पास होईल, अशी शक्यता आहे. शिवाय भाजपमध्येही काही आलबेल आहे , असे नाही. अंतर्गत मतभेद समोर येऊ शकतात, अशी बोलले जात आहे.
संख्या जुळण्यासासाठी दोन्ही काँग्रेसला करावी लागणार कसरत
जर पालकमंत्र्यांची नियुक्ती आधी झाली असती तर गेली अधिक फरक पडला असता. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा विलंब हा भाजपच्या पथ्यावर पडेल, आता तीनही पक्षांच्या आमदारांची ही खरी कसोटी असेल. त्यांनी आता काही केलं नाही तर सदस्यांमध्ये नाराजी पसरेल, अशी एक शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराला होणारा विलंब भाजपच्या पथ्यवार पडण्याची शक्यता आहे.