जळगाव : आकाशात घडणाऱ्या नैसर्गिक चमत्कारांपैकी एक असलेल्या पिधानयुतीचा दुर्मिळ योग जळगावकरांना शनिवारी अनुभवता आला.
खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी यू ट्यूबद्वारे जळगावकराना याचे दर्शन घडविले. शनिवारी सायंकाळी ५.४७ मिनिटांनी या पिधानयुतीला म्हणजे मंगळाच्या समोर चंद्र यायला सुरुवात झाली. सूर्य आकाशात असल्याने ते बघता आले नाही. परंतु सूर्यास्तानंतर ज्यावेळी चंद्र दिसायला लागला, त्यावेळी चंद्राने मंगळाला पूर्ण झाकलेले होते. साधारण ७ वाजून २१ मिनिटांनी मंगळ चंद्राच्या हळूहळू बाहेर यायला लागला. ७ वाजून २७ मिनिटांनी मंगळ पूर्णपणे बाहेर आलेला होता. चंद्र आणि मंगळ यांच्या लपंडावाचा दुर्मिळ योगाचा आनंद सर्व खगोलप्रेमींनी यू ट्यूबच्या माध्यमातून घेतला. यावेळी खगोल अभ्यासक किरण वंजारी, श्रेया चौरासिया, रेवती वंजारी, हितेंद्र उपासनी आणि विवेक उपासनी उपस्थित होते.
यावेळी खगोल अभ्यासक सतीश पाटील यांच्यासह खगोलप्रेमी प्रथमेश पराग चौधरी यांनीदेखील खगोलप्रेमींसाठी ही संधी उपलब्ध करून दिली.