जळगाव मनपा निवडणूक : २५ कोटी अखर्चित अन् आता २०० कोटींचे लॉलीपॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:36 PM2018-07-15T12:36:13+5:302018-07-15T12:38:08+5:30
चार वर्षात शहरातील गाळे, हुडको प्रश्न लावला नाही मागी
जळगाव : केंद्रात आणि राज्यातही सत्तेत असताना विविध आश्वासनांकडे पाठ फिरवत शहरातील अनेक प्रश्नांचे भिजत घोंगडे ठेवणाऱ्या भाजपाने मनपा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आता २०० कोटींच्या निधीचे लॉलीपॉप दाखवणे सुरु केले आहे. याआधी मात्र २५ कोटींचा निधी तर दिला मात्र तो खर्ची पडू दिला नाही, हे जनता विसरली नसताना या नवीन आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा ? असा प्रश्न आता जनतेतून व्यक्त होवू लागला आहे.
मनपात सत्ता ही खान्देश विकास आघाडीची आणि शहराचे आमदार हे भाजपाचे आहे. मात्र केवळ शहराचा विकास होवू द्यायचा नाही, आणि हे खापर मनपावर फोडायचे अशी रणनिती भाजपाने आखल्याचे सुज्ञ मतदारांमध्ये बोलले जात आहे. जळगावकरांनी आमदार देवूनही भाजपा सरकारकडून शहराला झुलवतच ठेवले गेले, अशी चर्चा आता होवू लागली आहे.
मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी शहराच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचे मान्य केले मात्र २५ कोटींचा हा निधी देण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लावला. यानंतर या निधीतील कामांच्या नियोजनाचा घोळ व निधीतील कामे ठरविण्याचा अधिकार या विविध बाबींमध्ये दिवस वाया घालविण्यात आले. अखेर हा निधी खर्च होवू शकला नाही.
केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. असतानाही गाळे कराराचा प्रश्न, हुडको कर्जफेडीचा विषय यासह अनेक विषय प्रलंबीत ठेवले. आता मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शहराच्या विकासासाठी एकहाती सत्ता द्या, शहराचा वर्षभरात विकास करु, २०० कोटींचा निधी आणू असे आश्वासने भाजपातर्फे दिले जात आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असताना चार वर्षात जळगावचा विकास भाजपाने केला नाही, आता सत्ता आल्यावर विकास नक्की करणार की नाही? यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उपस्थित होत आहे. जळगावकरांना २०० कोटींचे लॉलीपॉप दिले जात असल्याचाही सूर उमटू लागला आहे.