जामनेरला एकाच समुदायाचे दोन गट भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 03:31 PM2020-04-05T15:31:12+5:302020-04-05T15:32:39+5:30
महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एकाच समुदायातील दोन गट आपापसात भिडले.
जामनेर, जि.जळगाव : लॉकडाऊन असल्याने गस्तीवरील पोलिसांची गाडी येथील अराफत चौकात येताच पळ काढणाऱ्या तरुणांपैकी एकाचा महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एकाच समुदायातील दोन गट आपापसात भिडले. हाणामारीत सहा ते आठ जण झाले जखमी आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जळगावला हलविले.
लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या पोलिसांची विविध भागात गस्त सुरू आहे. शनिवारी रात्री पोलिसांची गाडी अराफत चौकात आली असताना थांबलेल्या तरुणांना पोलिसांनी हटवले. पोलीस गाडी आल्याचे पाहून काही तरुण बशीर नगरकडे पळत असताना त्यातील एकाचा महिलेस धक्का लागला. यावरून रात्रीच वादाला सुरुवात झाली. मात्र मध्यस्तीनंतर वाद मिटला.
दरम्यान, वादाची धुसफूस कायम असतानाच याच कारणावरून रविवारी सकाळी अराफत चौकात सकाळी अकराच्या सुमारास दोन्ही गट लाठ्याकाठ्या चाकू व कुºहाडसारखी धारदार शस्त्र घेत एकमेकांवर भिडले. तुंबळ हाणामारीत शेख जलील शेख सईद, शेख जमील शेख रसूल, शेख अल्ताफ शेख सईद, साबीर शेख यूनुस, आबिद शेख खालिद, अजीम शेख जलील जखमी झाले. त्यांच्यावर डॉ.विनय सोनवणे, डॉ.प्रशांत महाजन यांनी उपचार करून जळगावला पाठविले. चार ते पाच किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.
अराफत चौकातील हाणामारीच्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जमावास पांगविले.