जामनेर : शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगातून गोळा करून आणलेला कचरा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी नगरपालिका कार्यालयासमोर आणून फेकला. डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालिकेने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सात दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लागली नाही तर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंगू सदृश्य रुग्णाची संख्या वाढत आहे.पालिकेकडून कचरा उचलण्यात दिरंगाई होत आहे. गटारी स्वच्छ केल्या जात नाही, परिणामी डासांची संख्या वाढत आहे. पालिकेने फवारणी करण्याची मागणी होत आहे.निवेदनात म्हटले आहे की, लोकांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांना नागरिकांच्या आरोग्याचा विसर पडलेला आहे. सर्वच वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेली पालिका हीच का, असा प्रश्न निर्माण होतो.यावेळी शहराध्यक्ष पप्पू पाटील, माधव चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील,संदीप हिवाळे, सागर पाटील, अनीस पठाण, कृष्णा माळी, मोहन चौधरी, इम्रान शेख, जुबेर शेख,जमील शेख, प्रभू झाल्टे, विशाल पाटील, भूषण पांढरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.शहरातील नागरिकांची कचऱ्याबाबत कोणतीही तक्रार नाही. कचरा गोळा करून पालिका कार्यालयात आणणे हा राष्ट्रवादीचा राजकीय स्टंट आहे.-अनिस शेख, उपनगराध्यक्ष, जामनेर पालिकाकोरोनासारख्या संकट काळात नगराध्यक्ष, नगरसेवक घराबाहेर पडले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मुख्याधिकारी यांनी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.-पप्पू पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, जामनेर