फॉर्मसीच्या विद्याथिर्नीच्या मृत्यूनंतर जामनेरात रुग्णालयाची केली तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 06:12 PM2020-11-08T18:12:30+5:302020-11-08T18:22:39+5:30
खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा औरंगाबादला नेताना सिल्लोडजवळ दुर्दैवी मृत्यू झाला.
जामनेर, जि.जळगाव : येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा औरंगाबादला नेताना सिल्लोडजवळ दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे नातेवाईकांनी तिचा मृतदेह रुग्णालयात परत आणला. डॉक्टर नसल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना जामनेरातील साई हॉस्पीटलमध्ये रविवारी दुपारी घडली. संबंधित डॉक्टर सकाळपासून गायब आहेत.
जामनेरमधील प्रकाशनगरमध्ये राहणारी दीपाली अर्जुन चौधरी (२२) या तरुणीच्या मानेवर लहान गाठ असल्याने तिला गुरुवारी या दवाखान्यात पालकांनी तपासणीसाठी आणले. तपासणीनंतर डॉ. सुरेश नाईक यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. शुक्रवारी रात्री तब्येत बिघडल्याने शनिवारी पुन्हा दाखल केले. डॉक्टरांनी तिला दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यास सांगितले.
या दवाखान्यातील डॉक्टरांनी तिला उपचारासाठी औरंगाबादला नेण्यास सांगितले. औरंगाबादला नेत असताना सिल्लोडजवळ तिचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह साई हॉस्पीटलमध्ये आणला. मात्र उपचार करणारे डॉ. सुरेश नाईक ह दवाखान्यात नसल्याने संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सहकाऱ्यांसह दवाखान्याकडे धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली. मृत तरुणी येथील फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होती. तिचा मंगळवारी शेवटचा पेपर होता. तिच्या पश्चात आई, वडील लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे.
रास्तारोको व पोलीसांची धावपळ
दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी सायंकाळी साडेपाचला दवाखान्यासमोरील जामनेर पहुर रस्त्यावर ठाण मांडत रास्ता रोको केल्याने पोलिसांची धावपळ झाली. पहुरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, प्रताप इंगळे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.