जनआरोग्य योजनेचा ११४ रुग्णांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:54+5:302021-08-27T04:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात एकूण ११४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरू झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात एकूण ११४ रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात आले. यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
या योजनेतून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनानेदेखील जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला आहे. योजनेमधून २२ जुलै ते २६ ऑगस्टपर्यंत कोरोनाविरहित ११४ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश रामानंद, सदस्य सचिव तथा उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, संदीप माळी, तेजस वाघ हे रुग्णांसह नातेवाइकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. ज्या रुग्णांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी रुग्णालयातील कार्यालयात अथवा अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यांना झाला लाभ
वर्षभरात किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, महिलांच्या गर्भाशयाच्या समस्या, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डेंग्यू, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनादेखील लाभ झाला आहे.