जयंतराव, तुम्ही आमचा २५ वर्षांचा संसार मोडला; गिरीश महाजन यांची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 02:40 PM2021-11-30T14:40:01+5:302021-11-30T14:40:32+5:30
Politics News: गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जळगावात लगावला. तर आपण गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
जळगाव : गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जळगावात लगावला. तर आपण गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांच्या विवाह सोहळ्यासाठी सोमवारी पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या आवारात वधू-वरांना आशीर्वाद देताना गिरीश महाजन यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना चांगल्या कोपरखळ्या हाणल्या. या सोहळ्याला राज्यातील प्रमुख मंत्री तथा माजी मंत्री व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाजनांचा टोला, ही त्यांची खदखद
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या कोपरखळीला उत्तर देताना, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीदेखील जोरदार उत्तर दिले. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खदखद अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या-त्या ठिकाणी ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला मी गांभीर्याने घेत नसून, त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
डझनभर मंत्र्याची उपस्थिती
या विवाह सोहळ्याला राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांनी उपस्थित राहून वधू-वराना आशीर्वाद दिले. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार या मंत्र्यांनी हजेरी लावली.