जि़प़ शिक्षण विभागालाच अभ्यासाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:24 PM2019-07-05T12:24:09+5:302019-07-05T12:24:40+5:30
घोळ समोर येत असताना बदल्यांच्या पारदर्शकतेचा गवगवा कशासाठी
आनंद सुरवाडे
जळगाव : जिल्हाभरात प्राथमिक शिक्षणाचा कसा बोजवारा उडाला आहे याची असंख्य उदाहरणे गेल्या आठ दिवसातच समोर आलेली आहेत़ अगदी शाळा खोल्यांच्या गंभीर प्रश्नापासून ते थेट वर्गाला शिक्षकच नसल्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे़ शिक्षकांचीच संख्याच कमी आहे, असे सांगत शिक्षण विभाग हात वर करून सर्व जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास येत आहे़ जामनेर तालुक्यातील ढालगावच्या प्रकरणाने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडेच काढले आहे़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दोन महिने शिक्षणाधिकारीच नव्हते़ कसेबसा उपशिक्षणाधिकारी डिगंबर देवांग यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला़ त्यामुळे शाळा सुरू झाल्या त्या शिक्षणाधिकारी नसताना़ अशातच जिल्हा परिषदेत सहा ते आठ वर्षांनी शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली़ त्यानंतर बदली प्रक्रिया पार पडली़ ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने झाल्यामुळे अत्यंत पारदर्शकपणे झाल्याचा दावा प्रशासन करते़ मात्र, त्यानंतर समोर येणाऱ्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा समोर येणारा गंभीर प्रश्न, होणोारे आरोप- प्रत्यारोप, राजकीय लोकप्रतिनिधींचा बदली प्रक्रियेतील सहभाग, आपल्याला या प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याचे सांगत नाराज झालेले शिक्षण सभापती हे सर्व प्रकार प्रशासनाचे हे सर्व दावे फोल ठरवते़ नशिराबादच्या शाळेत १३६ हून अधिक विद्यार्थी संख्या असतानाही एका शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची बदली करण्यात येते़ ढालगाव येथील उर्दू शाळेचे तीन शिक्षक बदलून येथे दोन शिक्षक दिले़ ते रूजू व्हायला तयार नाहीत़ शिक्षक आणि प्रशासनाच्या हेव्या दाव्यांमध्ये विद्यार्थ्यांचे जे भविष्य खराब होत आहे त्यास जबाबदार कोण यात विद्यार्थी पालकांचा काय दोष़़़़ लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या विषयाकडे अक्ष्यम दुर्लक्ष केलेले आहे़ याची प्रचिती जिल्हा परिषदेतच आली़ पाच पैकी केवळ दोनच सदस्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, अनेकांनी केवळ बाजूने निसटून जाण्यात धन्यता मानली़ अधिकाऱ्यांना खाली यायला तीन तास लागले़ जर आपण आजच्या विद्यार्थ्यांना उद्याचे भविष्य म्हणत असू, त्यांच्या शिक्षणासाठी वरिष्ठ पातळीवरून मोठ मोठ्या निधीच्या घोषणा केल्या जात असतील, कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे वांरवार नुसते सांगितलेच जात असेल, आणि जर या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही राजकीय, प्रशासकीय मंडळी केवळ 'शाळा'च भरवत असतील तर हे भविष्य अंधारात आहे़़़़़ हे सांगायला भविष्यकाराची गरज नाही़