कजगाव, ता. भडगाव : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी संपला आहे. मात्र दीड महिन्यात कजगाव परिसरातील नदी, नाले सारेच कोरडे पडले आहेत तर बागायत विहिरीच्या जलपातळ्या खोल जात असतानाच दुसरीकडे मात्र पीक परस्थिती चांगली आहे. रिमझिम बरसत असलेल्या सरींमुळे पिकांना केवळ आधार मिळत आहे. मात्र या परिसरातील तितूर नदीसह नाले अद्यापही कोरडेच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे, तिथे मात्र हिरवे रान फुलले असून येथे चक्क गुरे चारली जात असल्याने तितर नदी परिसरातील नागरिक दमदार पावसाची व तितूर नदी दुथडी भरून वाहण्याची वाट पाहत आहेत.
राज्यात काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. काही नद्यांना पूर आले आहेत. काहींनी धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या आहे. मात्र, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यातून वाहणारी तसेच पाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीस जवळजवळ अर्धा पावसाळा संपल्यानंतरही एक थेंब पाणी नाही. चक्क पावसाळ्यात या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. भर पावसाळ्यात या नदीची जागा पाण्याऐवजी चक्क हिरव्यागार गवताने घेतली असून नदी पात्र हिरव्यागार रानने फुलले आहे. गुरे चराईसाठी याचा उपयोग होत आहे. या भागात रिमझिम पडणाऱ्या पावसाने पीक चांगले तरारत आहेत. मात्र दमदार पाऊस नसल्याने नालेदेखील कोरडे पडले आहेत. विहिरींची जलपातळी खोल जाऊ लागल्याने दमदार पावसाची सारे शेतकरी वाट पाहत आहेत.
तितूर नदीस अनेक अडथळे
पाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीच्या उगमस्थानी पडणाऱ्या जेमतेम पावसामुळे नदीसदेखील जेमतेम पाण्याची धार येते. ती धार चाळीसगाव तालुक्याच्या हद्दपर्यंत पोहचते, नी तितुरची ही धार आटते. कारण गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी या नदीवर चाळीसगाव तालुका हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे (विना गेट)चे बनविण्यात आली आहेत. या बंधाऱ्यात जेमतेम येणारे पाणी पूर्णपणे जिरते. यामुळे नदीचे पाणी पुढे सरकत नसल्याने भडगाव व पाचोरा तालुक्यातील सात गाव तितूरच्या पाण्यापासून वंचित आहेत. यात भडगाव तालुक्यातील उमरखेड, तांदूळवाडी, भोरटेक, कजगाव, पासर्डी तर पाचोरा तालुक्यातील पिंप्री, घुसर्डी या गावात तितूरचे पाणी पोहोचतच नाही.
250721\25jal_9_25072021_12.jpg
भोरटेक शिवारात रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे दमदार पीक.