कासोदा पाणी योजना रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 09:42 PM2020-02-20T21:42:08+5:302020-02-20T21:43:23+5:30
११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे.
प्रमोद पाटील
कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे ११ कोटी रुपये खर्चाची होऊ घातलेली पाणी योजना जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादात येथील जनता भरडली जात आहे. यामुळे जनतेतून मात्र संताप व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत येथे सुमारे ११ कोटी रुपये खर्चाची अंजनी मध्यम प्रकल्पातून तत्कालीन आमदार डॉ. सतीश पाटील यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले होते. दररोज दरमाणशी ४० लीटर पाणी असे ६२०० कुटुंबाना म्हणजे २६१२० लोकसंख्येसाठी १-६७ द.ल.लीटर पाणी ह्या योजनेला दि.२३ मार्च २०१७ प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. दि.११ एप्रिल २०१८ ला कायार्रंभ झाला असून चाळीसगाव येथील ठेकेदार जे.जे. चौधरी यांनी दि.२६ मार्च २०२० मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. धरण क्षेत्रातील जँकवेल व पंपग्रुहासह ८.८३ कि.मी. पाईपलाईन टाकण्याची कामे झाली असून जलशुद्धीकरण प्रकल्प, गावातील पाईप लाईन ही कामे पूर्णपणे बाकी आहेत. जलकुंभाची कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
दरम्यान, काम मुदतीत न केल्यामुळे संबंधित ठेकेदाराला ५६ लाख रुपये दंड करण्याची शिफारस जीवन प्राधिकरण विभागाने केली आहे. शासकीय मंजुरी उशिरा मिळाल्याने कामाला उशिराने सुरवात झाल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांना या योजनेबाबत खूप उत्सुकता आहे, कारण कासोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासाठी प्रसिद्ध आहे. या गंभीर समस्येमुळे नोकरदार येथे रहात नाहीत, बाहेर गावाहून ये जा करतात. गेली २०ते २५ वर्षे हे गाव पाणी समस्येशी झुंज देत आहे. परंतू जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या वादामुळे गावकऱ्यांना धरणात मुबलक पाणी असूनदेखील पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लोकप्रतिनिधीनी या गंभीरप्रश्नी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
ठेकेदार कामाकडे लक्ष देत नसल्याने १८० दिवसांसाठी दररोज ३११३५ रुपये याप्रमाणे ५६ लाख चार हजार ३०० एवढा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही पहिली कारवाई आहे. येत्या काही दिवसात कायद्याप्रमाणे अजून मोठी कारवाई करण्यात येणार आहे.
-उपविभागीय अधिकारी संजीव नेमाडे, जीवन प्राधिकरण, एरंडोल.
मुदतवाढ मिळेल. नोव्हेंबरमध्ये कामाची मंजूर मिळाली आहे. त्यामुळे इतर कामे करताना वेळ लागतो. दंड आकारणीबाबत मला कुठलेही पत्र मिळालेले नाही.
-अमोल चौधरी, ठेकेदार, चाळीसगाव.
ठेकेदाराची काय अडचण आहे ते कळत नाही. ग्रामपंचायतीने सतत संबंधितांशी पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे.गावाला त्वरित पाणीपुरवठा झाला पाहिजे.
- मंगला राक्षे, सरपंच, कासोदा