भुसावळ : तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधार योजना, स्वच्छ भारत मिशन तसेच चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत गैरव्यवहार झाला असून, या कामांच्या चौकशीसाठी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यावर कारवाई होत नसल्याने या प्रकरणी चौकशीला गती द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दलित पँथरने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, खंडाळा ग्रामपंचायतीत सन २०१५-२०२० च्या कालावधीत दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून, दोन ते तीन वेळा एकाच ठिकाणी काँक्रिटीकरणाची रस्त्याची कामे दाखवली. अंदाजपत्रक केले नसून यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी बोगस लाभार्थी दाखवून तसेच मयतांंच्या नावे तसेच ज्यांनी अगोदरच शौचालय बांधले आहे अशा लोकांच्या नावे निधी लाटला आहे. दुसऱ्या योजनेतील केलेली कामे सुद्धा चौदाव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत दर्शविली आहेत. सन २०१५-२०२० या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पँथरचे सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हा सरचिटणीस व ग्रा.पं. सदस्य प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे उपस्थित होते.
हा जो प्रकार आहे ती नेहमीच होत असतो. कधी माहिती अधिकारमधून किंवा इतर काही माध्यमातून फक्त राजकीय स्टंट आहे. बाकी काही नाही. चौकशी झाली की सत्य काय आहे ते समोर येईलच. यापूर्वीही यांनी आरोप केले होते. त्याचं काय झालं ते पण सांगावे यांनी. भ्रष्टाचार केला असता तर सन २०१९/२० मध्ये गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला नसता, तो पण जिल्हास्तरीय.
-विजय अमरसिंग काकरवाल, ग्राम विकास अधिकारी, खंडाळा