ज्ञात व्हायरसने पाचोऱ्यात बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:08+5:302021-06-17T04:12:08+5:30
पाचोरा : अज्ञात व्हायरसने इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत, असलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील विवेकानंद नगरात ...
पाचोरा : अज्ञात व्हायरसने इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत, असलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा शहरातील विवेकानंद नगरात घडली आहे. प्रथमेश प्रल्हाद पाटील असे या बालकाचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, मूळ एरंडोल येथील असलेले व सध्या पाचोरा येथे विवेकानंद भागातील रहिवासी गणेश पॅथॉलॉजीचे प्रल्हाद पाटील यांचा एकुलता एक मुलगा प्रथमेश प्रल्हाद पाटील हा गेल्या आठवड्यात १० रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ऑनलाइन क्लास करीत असताना, अचानक थंडी वाजून ताप आला. हे लक्षात आल्यावर त्याला तत्काळ येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र, त्याच वेळी ताप १०६ डिग्रीपर्यंत गेला. अशा परिस्थितीत त्याला तातडीने जळगाव येथे हलविले. मात्र, बालकाची स्थिती अधिक धोकादायक झाली. सिटी स्कॅन केल्यावर निदान झाले. मात्र, या अज्ञात व्हायरसने तडकाफडकी त्याचा मृ्त्यू झाला.
असा आहे आजार
हा व्हायरस जपानी ॲसिपिलियाटीस नावाचा दुर्मीळ आजार झाल्याचे प्रथमदर्शनी उपचार करणाऱ्या जळगाव येथील नामांकित डॉक्टरांनी अंदाज व्यक्त केल्याचे सांगितले जाते. मात्र, अवघ्या ५४ तासांतच बालकाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. एकुलत्या मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने प्रल्हाद पाटील यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. कुठलेही लक्षण नसताना अचानक हा दुर्मीळ आजार झाल्याने सर्वत्र घबराट पसरली. एरंडोल येथे बालकाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, हा आजार लाखातून एकाला होत असतो. विशिष्ट प्रकारचा डास चावल्याने ५ ते ७ दिवसांत लक्षणे दिसून तत्काळ मृत्यू ओढावतो, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले.
-----
फोटो १७सीडीजे१