लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवार सकाळी झालेल्या पावसामुळे चाळीसगाव शहर व परिसरात पुराने थैमान घातले आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील इतर १४ तालुक्यांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात एकाच रात्रीत रेकॉर्डब्रेक १२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या हंगामातील एकाच दिवशी झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद आहे. दरम्यान, जळगाव शहर व ग्रामीणमध्ये देखील मंगळवारी सकाळी व दुपारीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील एकूण सरासरीत वाढ झाली आहे.
यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अद्यापही १० ते १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. मात्र, सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, चाळीसगाव तालुक्यात पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. तितूर नदीलादेखील मोठा पूर आला आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात १२३ मिमी पावसाची नोंद झाली असताना, इतर तालुक्यांमध्ये मात्र २५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी १९६ मिमी पाऊस होत असतो, त्यापैकी आतापर्यंत १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जळगाव शहरात दिवसभर चालला पावसाचा खेळ
जळगाव शहरात मंगळवारी दिवसभर राहून-राहून पावसाने हजेरी लावलेली पहायला मिळाली. सकाळी १० वाजता सुमारे १५ ते २० मिनीटे पावसाने हजेरी लावल्यानंतर दुपारी ३ वाजतादेखील विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह अर्धातास पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ६ वाजेपासून शहरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली होती. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला. मात्र, रस्त्यांवर पुन्हा चिखल झाल्याने जळगावकरांचा त्रास देखील वाढला.
पुर्व हंगाम कापसाला फटका, केळीला फायदा
जिल्ह्यात पुन्हा पावसाचे पुनगरामन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, मक्यासह केळी व कोरडवाहू कापसाला फायदा होणार आहे. मात्र, पुर्वहंगाम कापसाला या पावसामुळे काही प्रमाणात फटका बसू शकतो. यासह ज्या शेतकऱ्यांचे उडीदाचे पीक काढलेले नाही अशाठिकाणीदेखील उडीदाचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस - ४१८ मिमी
एकूण सरासरीच्या टक्केवारीत - ८२ टक्के
या तालुक्यात सर्वाधिक पाऊस - चाळीसगाव (१४४ टक्के)
या तालुक्यात सर्वात कमी पाऊस - चोपडा (५२.५ टक्के )
दिवसभरात झालेला पाऊस (तालुकानिहाय, मिमी मध्ये)
जळगाव -१३
भुसावळ- ११.७
यावल- ११.२
रावेर- ११.७
मुक्ताईनगर-६.१
अमळनेर- १३.१
चोपडा- ८,६
एरंडोल-१३.८
पारोळा- १४.३
चाळीसगाव- १२३.२
जामनेर- ३१.४
पाचोरा- २०.४
भडगाव-१९.१
धरणगाव-११.६
बोदवड-१७.९