गुगल शीट अपडेशननंतरच मिळणार कोविड रुग्णालयांना रेमडेसिवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:23+5:302021-04-05T04:15:23+5:30
अन्न व औषध प्रशासनाचे नियाेजन : पुरवठा कमी असल्याने इंजेक्शनवर नियंत्रण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेमडेसिवीर या इंजेक्शनाचा ...
अन्न व औषध प्रशासनाचे नियाेजन : पुरवठा कमी असल्याने इंजेक्शनवर नियंत्रण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेमडेसिवीर या इंजेक्शनाचा पुरवठा कमी होत असल्याने तुटवडा असून यावर नियंत्रण म्हणून आता कोविड रुग्णालयांनी त्यांच्याकडे दाखल रूग्ण, इंजेक्शनची आवश्यकता असणारे रुग्ण यांची तपशीलवार माहिती गुगलशिटवर अपडेट केल्यानंतरच या रुग्णालयांना हे इंजेक्शन मिळणार असल्याची माहिती औषध निरीक्षक अनिल माणिकराव यांनी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच पुरवठा कमी असून, आवश्यक त्या रुग्णांसाठीच रेमडेसिवीर वापरावे, पर्यायी औषधांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन हे प्रिस्क्राइब करण्याचे अधिकार हे एमबीबीएस किंवा त्यापेक्षा अधिक क्वालिफिकेशनच्या डॉक्टरांनाच असून, बीएएमस, बीएचएमएस डॉक्टरांनी ते प्रिस्क्राइब करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आयएमएच्या तसेच केमिस्ट संघटनेच्या बैठकीत दिले आहे.
जिल्ह्याला पाच हजार इंजेक्शनची मागणी असताना एक हजार किंवा अडीच हजार असे इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. शनिवारी जो साठा आला तो प्राधान्याने ज्या ठिकाणी अधिक रुग्ण होते. अशा ठिकाणी चोपडा, चाळीसगाव,जळगाव या ठिकाणी कोविड हॉस्पिटलला प्राधान्याने दिल्याची माहिती अनिल माणिकराव यांनी दिली.