कोविडच्या धसक्याने सिव्हिलमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्यांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:19 AM2021-02-27T04:19:48+5:302021-02-27T04:19:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वीच नॉन कोविड सुविधा पूर्ववत सुरू झाली, मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वीच नॉन कोविड सुविधा पूर्ववत सुरू झाली, मात्र, पुन्हा कोविडने डोकेवर काढल्याने अनेक ओपीडी व दाखल रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच काहीसे चित्र प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात कक्षात असून या दोनही कक्षात सद्या उपलब्ध बेड अधिक आणि दाखल महिलांची संख्या कमी अशी स्थिती आहे. प्रथमच असे चित्र असल्याचे समजते.
गेल्या वर्षी या कक्षांमध्ये पुरेसे बेड नसल्याने महिलांना जमिनीवर झोपावे लागले होते. त्यावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून बाहेरही बेड टाकण्यात आले होते. मात्र, आता प्रत्येक कक्षात दोन ते तीन बेड खाली राहत आहेत. दरम्यान, सकाळी या कक्षांमध्ये पाहणी केली असता, नातेवाइकांची गर्दी झाली होती. शक्यतोवर नवजात शिशू काळजी कक्षाबाहेर नातेवाईक बसून राहतात. या ठिकाणीच जेवण करतात, स्वच्छतेच्या बाबतीत मात्र, आधीपेक्षा अधिक सुधारण असल्याचे चित्र आहे. यासह डॉक्टरांचे नियमित राऊंड होत असल्याचे रुग्ण स्वत: सांगत आहे.
प्रत्येक कक्षाबाहेर सीसीटीव्ही कॅमेेरे
नव्या बेडशिट, स्वच्छता, पाणी या बाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधीपेक्षा सुधारणा जाणवत आहे. दोन्ही कक्षांबाहेर महिला सुरक्षा रक्षक तैनात असून प्रत्येक कक्षाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जागेची अडचण नको म्हणून पूर्ण जागेचा वापर करण्यात आला असून बाहेरही काही बेड टाकून व्यवस्था करण्यात आलेली आहे.
बाळांतपणासाठी आलेल्या महिलांसाठी उपलब्ध खाटा : २०, दाखल महिला ९
बाळांतपणानंतर सामान्य प्रसूतीसाठी उपलब्ध खाटा : १३ दाखल महिला ६
बाळांतपणानंतर सिझेरियन प्रसूतीसाठी उपलब्ध खाटा ३५ दाखल महिला ३०
डॉक्टरांचा दोनवेळा राऊंड
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. संजय बनसोडे यांच्याकडे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी आहे. ते दिवसातून दोन राऊंड प्रत्येक कक्षात मारतात, यासह प्रसूती कक्षामध्ये कनिष्ठ डॉक्टर पूर्ण वेळ नियुक्त असतात.
-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे दिसभरातून दोन वेळा प्रत्येक कक्षात जाऊन तपासणी करीत असतात.
- पाहणी केल्यानंतर आधीपेक्षा नातेवाइकांची गर्दी कमी प्रमाणात होती. सकाळी थोडी गर्दी वाढलेली होती. नवजात शिशू काळजी कक्षाबाहेर पायऱ्यांवरच नातेवाईक बसलेले असतात.
वेळेवर दाखल करून घेण्यात येते, डॉक्टर वेळेवर असतात, गोळ्या, औषधी, लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. जे ऐकून होतो त्यापेक्षा सिव्हिल आता चांगले झाले आहे. - बाळंतीण महिला
आधीपेक्षा बऱ्याच प्रमाणात सुधारणा झालेल्या आहेत. आम्ही सिव्हिलबाबत ऐकूण होतो, मात्र, तसे काही चित्र नव्हते, डॉक्टर वेळेवर तपासणीसाठी येतात. परिचारिका पूर्ण वेळ थांबून असतात. वेळेवर उपचार मिळतात - प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे नातेवाईक