पारोळा : तालुक्यात सगळाकडे पाऊस पडतो, पण आमच्या गावातच पडतच नाही... पेरणी झाली, आता पावसाची वाट पाहतोय... आपण केलेली कामे तशीच रहातील का... या विचाराने शेतकरी हैराण झाले असतानाच रात्रभर पाऊस पडला आणि गाव चिंब करून गेला.मोंढाळे प्र.अ. हे वॉटर कप स्पधेतील सहभागी गाव आहे. मार्चपासूनच शोषखड्डे, माती परीक्षण व बायोडायनामिक कंपोस्ट या कामांना गावाने एकजुटीने सुरूवात केली होती. पन्नास दिवस गावातील प्रत्येक जण श्रमदान करीत होता. या कामात लोकसहभाग उत्तम मिळाला. श्रमदानाबरोबरच अनेक मशिनद्वारे काम सुरू होते. स्पर्धा संपली तेव्हा झालेले काम पाहून गावकरी व तालुक्यातील लोकही थक्क झाले. अफाट मेहनत घेत आपल्या शिवारातील एकही थेंब बाहेर जाणार नाही याची खात्री करून घेतली.१ जुलै रोजी बरसलेल्या पावसाचे पाणी पूर्णपणे अडविले गेले. सर्व कामांद्वारे जलसिंचन होऊन गाव पाणीदार होऊन ग्रामस्थांच्या श्रमदानाला यश मिळाले आहे.