लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पदावरुन हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
बकालेंनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर समाजात तीव्र संताप उमटला. पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन काळ्या फिती लावून त्यांच्याविरोधात घोषणबाजी करण्यात आली. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठविला होता. त्याशिवाय यात खातेअंर्तगतही चौकशी सुरु झालेली आहे. गणेशोत्सव काळातील ही क्लीप असल्याचे सांगितले जात आहे. यात पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणही चव्हाट्यावर आलेले आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर बकाले रजेवर गेले आहेत.