वाचनालये साहित्य, संवादाची केंद्रे व्हावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:44 PM2019-12-31T23:44:59+5:302019-12-31T23:45:11+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत जामनेर येथील साहित्यिक दिलीप देशपांडे...

Libraries should become centers of literature and communication | वाचनालये साहित्य, संवादाची केंद्रे व्हावीत

वाचनालये साहित्य, संवादाची केंद्रे व्हावीत

Next

‘वाचन संस्कृती’चा विषय चर्चेत आल्यानंतर अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे रहातात. मग हल्ली एकूणच वाचनाची आवड कमी झालीय का? नसेल तर कुठल्या प्रकारचे वाचन होतेय? कुठल्या माध्यमातून होतेय? म्हणजे वाचनात कुठल्या माध्यमाचा वापर जास्ती होतोय. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वसाधारण पुरुष व महिला वाचक, पन्नासच्या आतील, त्यावरील असे भाग करता येतील. ते काय वाचता? कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र, आत्मचरित्र, ललित, विज्ञानविषयक, ऐतिहासिक, संत साहित्य, प्रवास वर्णन, बालसाहित्य, मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्र अशा अनेकविध प्रकारचा विचार त्यात येतो.
गेल्या काही वर्षात मोबाइल, दूरचित्रवाणी, संगणक, त्यावरील गेम, इंटरनेट अशा साधनांच्या वाढलेल्या वापरामुळे वाचनाचा वेळ फार मोठ्या प्रमाणात विभागला गेला आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. मोबाइलवर फेसबुक, व्हाट्सएप, यू ट्यूबमध्ये जास्त वेळ खर्च होत असल्याचे आपले निदर्शनास येते. ई-बुक वाचणारा वर्ग आहे, पण तसा तो जास्त नाही. मर्यादितच आहे. त्यामुळे साधारणपणे १६ ते ३०/३५ ह्या वयोगटातील वाचनाची आवड तशी कमी झाल्याचे दिसून येते. काही वर्षापूर्वी नॅशनल बुक ट्रस्टच्या सर्वेक्षणात ४६ लाख युवकात फक्त ९ लाख युवकच वाचन करत असल्याचे निदर्शनास आले होते. आता तर त्या परिस्थितीत अजूनही बदल झाला असावा.
वाचन समृध्दीसाठी अनेकविध प्रकारे, वेगवेगळ्या पातळीवरील प्रयत्न केले जातात. सर्वेक्षण केले जाते व योजनांची आखणी केली जाते. ग्रंथालयांना अनुदानही दिले जाते. अनेक ग्रंथालये सक्षम आहेत. स्वत:ची इमारत आहे. मंगल कार्यालये आहेत. व्यापारी संकुल आहेत. परंतु काही वाचनालयांच्या कार्यकारी मंडळांच्या निष्क्रियतेमुळे आणि मुळातच त्यांना वाचन, साहित्य याविषयी गोडी नसल्यामुळे अशी ग्रंथालये ही साहित्यिक अड्डे होऊ शकली नाहीत. राजकारणाचा शिरकाव होऊन राजकीय अड्डे मात्र झाले आहेत, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. वाचनालयाच्या निवडणुका समोर ठेवून कोणाला कोणत्या प्रकारचे सभासदत्व द्यायचे इथपासून निर्णय घेतले जातात, ही शोकांतिका आहे.
खरं तर आज प्रत्येक तालुका आणि जवळपास ७० ते ८० टक्के ग्रामीण भागात ग्रंथालये आहेत. त्यांना ग्रामविकास निधीतून सहाय्य मिळत असते. पण त्याचा फायदा घेतला जात नाही. ग्रामीण भागात तर वाचनाची फारच दुरवस्था आहे. अनेक ग्रंथालयात पुस्तके पडून आहेत. कारण ती ग्रंथालये बंदच असतात. ज्याच्याकडे काम सोपवले असते तेच उदासीन असतात. वेळ मिळेल तेव्हा उघडतात. त्यांना मिळणारा अल्प पगार हेसुुुध्दा त्यामागचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळेच वाचकांपर्यंत पुस्तके पोहचत नाहीत.
शाळा कॉलेजेसमधून पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना इतर वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. चरित्रे, आत्मचरित्रे, विज्ञान आणि अनेक प्रेरणादायी पुस्तकांची ओळख करून द्यायला हवी. शाळा महाविद्यालयातही पुस्तक प्रदर्शने भरवली पाहिजेत. साहित्यिकांची ओळख, त्यांच्याशी संवाद हा कार्यक्रम आयोजनातून विद्यार्थ्यांची आवड वृद्धिंगत करायला हवी. वेळोवेळी विद्यार्थ्यांनी कुठली पुस्तके वाचावीत ह्याच मार्गदर्शन करायला हवे, तरच हे शक्य आहे. खूप साºया पुस्तकांनी ही वाचनालये समृद्ध असतात. वाचाल तर वाचाल, वाचनाने मन समृध्द होते, पुस्तकासारखा मित्र नाही, दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असे वाचनाची महती सांगणारी वाक्ये लावलेली दिसतात. त्याकडे कधी गांभीर्याने पाहिले जात नाही.
एकूणच विद्यार्थ्यांचा वाचनाचा कल कमी झाल्याचे जाणवते.
आज शहरी भागात जसे नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठान, पुण्यात-पुस्तक पेठ, अक्षरधारा, म.सा.प. पुणे ग्रंथालय, मुंबईत ग्रंथाली, मराठी ग्रंथ संग्रहालय, जळगावला व.वा.वाचनालय, ठाणे, नागपूर, अकोला आणि बºयाच जिल्ह्यांच्या ठिकाणी, साहित्यिक कार्यक्रमाची केंद्रे आहेत. तिथे पुस्तक प्रदर्शन, साहित्यिक कार्यक्रम नेहमी होत असतात. बदलापूरचे ५००० सभासद असलेले ‘ग्रंथसखा’ वाचनालय एक उत्तम उदाहरण आहे.
तालुका पातळीवर पुस्तकाची अशी दुकाने जवळपास नाहीतच. क्वचित अपवाद असावा. त्यामुळेच वाचकापर्यंत पुस्तके पोहचत नाही.
पुस्तक प्रदर्शनही येतात, पण जिल्हा पातळीवरच ते येतात. तालुकापातळीवर ते फिरकत नाहीत.
ग्रंथालय आहेत, पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती त्या त्या ठिकाणच्या कार्यकारी मंडळाच्या आवडी निवडीवर अवलंबून असते.
काही वर्षांपूर्वी अक्षरधाराने बºयाच ठिकाणी पुस्तक प्रदर्शने आयोजित केली होती. तसेच ग्रंथालीनेही महाराष्ट्रात वाचक चळवळ राबवली. अनेक केंद्र उघडून वाचकांपर्यंत पुस्तके नेलीत. ‘मराठी वाचा-मराठी वाचवा’, ‘गोड बोला मराठीत’चा संदेश दिला. निम्मे किमतीत पुस्तके दिलीत. अजूनही अक्षरधारा, ग्रंथालीच कार्य सुरू आहे. पुण्यात चपराक प्रकाशनाने नवोदितांना लिहितं करून वर्षात ३६५ पुस्तक प्रकाशनाचा संकल्प केला आहे. अनेक वृत्तपत्रे रविवारच्या वाचनीय साहित्य पुरवण्या काढतात. त्यात अनेक उपक्रम, पुस्तकांचा परिचय होतो. वाचनीय साहित्य त्यात मिळते. पुस्तक प्रकाशक लेखक आपल्या भेटीला यासारखे उपक्रम करतात.
प्रत्येक तालुक्यात एक ग्रंथालय. साहित्य संवादाच केंद्र मानून पुस्तकांचं गावं निर्माण व्हायला हवे आहे. जिथे वाचन आणि पुस्तकांचं खरेदी केंद्र आणि साहित्यिक कार्यक्रमांचा अड्डा, कट्टा व्हावा. शासनाने त्यात सहभागी व्हावे. जसे महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ. ‘भिलार’ या ‘पुस्तकाच्या गावाची’ निर्मिती केली. पुस्तकाचे गाव बसविणे ही संकल्पना चांगली आहे. पण असं एक गाव बसवून चालणार नाही. पुस्तकांची अशी अनेक गावं महाराष्ट्रात निर्माण व्हायला हवी. ह्या गावांना भेट देऊन, तिथे जाऊन चांगल्या पुस्तकांचे वाचन, पुस्तक खरेदी हा हेतू साध्य होणेही तितकेच महत्वाचे आहे. ते पुस्तकांचच गाव व्हायला हवे. त्याच पर्यटन स्थळ मात्र व्हायला नको, हा विचार पुस्तकाचे गाव निर्माण करते वेळी करायला हवा. आपल्या राज्याच्या सांस्कृतिक विभागाने अशी पुस्तकांची अनेक गावं निर्माण करण्याचा जरुर विचार करावा, अशी अपेक्षा आहे.
-दिलीप देशपांडे, जामनेर, जि.जळगाव

Web Title: Libraries should become centers of literature and communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.