मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : आपण आयुष्यात खऱ्या अर्थाने गुरुमुळेच घडलो असल्याचे मुक्ताईनगर येथील माजी वकील तथा दारव्हा (जि.यवतमाळ) येथील कनिष्ठ स्तर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी कैलास अढायके यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ते प्रा.एल.बी.गायकवाड या आपल्या गुरुबद्दल बोलत होते.परिस्थिती हलाखीची असल्याने फी भरू शकत नव्हतो म्हणून डी.एड.ला प्रवेश घेतला नाही. दुसरीकडे इंग्रजी विषय कमकुवत असतानाही माझे कला गुण पाहून मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयात प्रा. एल.बी.गायकवाड यांनी कला शाखेत इंग्रजी विषय घेऊन प्रवेश घायला लावला. त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे इंग्रजी विषयात पदवी घेतली. त्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. वकील झालो. कालांतराने न्यायाधीश बनलो. आज ही न्याय निर्णय लिहिताना गुरूंनी दिलेल्या शिक्षणातून इंग्रजी विषयात मिळविलेल्या प्रभुत्वाचा फार उपयोग होत आहे. गुरुंचे या जन्मावर अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळेच हे जीवन घडलो.बारावीत ७० टक्के मार्क होते. परंतु इंग्रजी विषयात फक्त ५० गुण होते. अगदी बी.ए.च्या प्रथम सत्रापर्यंत इंग्रजी विषयात एक वचन, अनेक वचन शब्द मांडू शकत नव्हतो. अशा वेळेस इंग्रजी विषयाचे प्राध्यापक एल.बी.गायकवाड यांनी माझ्यावर मेहनत घेतली. आत्मविश्वास निर्माण केला आणि मी पदवी शिक्षण पूर्ण करेपर्यंत इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविले. कायद्याचे शिक्षण घेतले तर मुक्ताईनगर न्यायालयात वकिली करताना व्यावसायिक जीवनात गुरुंनी दिलेल्या शिक्षणाचे कौशल्य पूर्ण वापर करता आले. न्यायाधीश पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालो व आज दारव्हा येथे कनिष्ठ स्तर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी म्हणून सेवा बजवीत आहे. न्यायदानाच्या प्रक्रियेत इंग्रजी विषयांती प्रभुत्व सातत्याने उपयोगी पडत आहे. प्रा.एल.बी.गायकवाड यांनी दिलेल्या शिकवणीचा दर दिवसाला उपयोग होत आहे. त्यांच्या या विद्यादानातून माझे जीवन सार्थक झाले. जीवनाला दिशा मिळाली, नव्हे तर सन्मानाने जीवन जगत आहे. गुरूंच्या अनंत उपकाराची या जन्मात तरी परतफेड होऊ शकणार नाही. असे न्यायाधीश कैलास अढायके म्हणाले.
गुरुमुळे जीवन घडले-न्या.कैलास अढायके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:01 AM