अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृध्दाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 08:17 PM2020-08-14T20:17:56+5:302020-08-14T20:18:04+5:30
जिल्हा न्यायालयाचा निकाल : १४ साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
जळगाव : अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात लोटन फकीरा पाटील (६५, रा़ उत्राण, ता़ एरंडोल) यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. क़टारिया यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
उत्राण येथे घटना २१ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १ वाजता आरोपी लोटन याने या मुलीला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला होता़ ही बाब उघड झाल्यानंतर पीडीतेच्या आई-वडीलांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात त्याच दिवशी आरोपीविरूध्द भादवी कलम ३७६ (अ, ब), लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४, ५ (आय), ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्याच दिवशी रात्री आरोपीला अटक झाली.
अटक केल्यापासून हा आरोपी न्यायालयीन कोठडीत होता़ त्यानंतर तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी २४ जून २०१९ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या
१५ नोव्हेंबर २०१९ रोजी खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाल्यानंतर यात १४ साक्षीदार तपासण्यात आले़ त्यामध्ये पीडितेचे आई-वडील, पंच अमोल भोई, अशोक बावस्कर, पोलीस नितीन पाटील, नितीन मनोरे, वैद्यकीय अधिकारी कांचन चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गजानन काळे, शानुबाई भोई, न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेतील शुभांगी गाजरे, डीएनए तज्ज्ञ दीपक कुडेकर, वैद्यकीय अधिकारी निशाद फातेमा फिरोज शेख, सुनील पवार आदींच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या़ ६ मार्च २०२० रोजी शेवटचा साक्षीदार तपासण्यात आला होता.
याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे अॅड. सचिन पाटील यांनी कामकाज पाहिले.