विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, शहरात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 06:42 AM2021-05-30T06:42:30+5:302021-05-30T06:43:34+5:30
ठिकठिकाणी साचले पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शनिवारी दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर रविवारी पहाटे शहरात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. शनिवारी सकाळपासून कड़क उन होते. परंतु सायंकाळी ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर रविवारी पहाटे 3.30 वाजेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले होते, तर खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
शनिवारी दिवसभर ऊन असल्याने रात्रीपर्यंत नागरिकांना उकाडा जाणवत होता. रात्री 3.30 वाजताच्या सुमारास अचानक सुसाट वारा वाहू लागला. काही वेळेतच विजांचा लखलखट आणि ढगांचा गडगडटासह पावसाचे आगमन झाले. मुसळधार पाऊस सुमारे दीड तास सुरू होता. ढगांच्या गडगडाट इतका प्रचंड होता की, गाढ झोपलेल्या नागरिकांनाही पावसाचे जोरदार आगमन झाल्याचे कळाले. पावसामुळे पुन्हा हवेत गारवा निर्माण
झाला होता. तसेच काही भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. काही भागांमध्ये झाडे देखील कोसळली. तर काही घरांमध्ये पाणी शिरले होते.