लॉकडाऊनची शक्यता कमीच मात्र नियम मोडल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:02+5:302021-03-07T04:16:02+5:30
जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्ण समोर आले तरी उपचाराची सुविधा आहे. मात्र हा संसर्ग वेळीच रोखणे ...
जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्ण समोर आले तरी उपचाराची सुविधा आहे. मात्र हा संसर्ग वेळीच रोखणे आवश्यक असून १५ मार्चपर्यंत वाढविलेल्या निर्बंधांच्या कालावधीत बंधने पाळल्यास नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मृत्युदरावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. मृत्युदर २.१९वर आला आहे. यात काही जण पूर्ण लॉकडाऊनची मागणी करीत असले तरी त्याची शक्यता कमीच असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
प्रलंबित अहवालांमुळे वाढती संख्या कोरोना चाचण्या वाढविल्याने प्रलंबित अहवालांचीही संख्या वाढली. मात्र आता त्यांचे अहवाल हळूहळू येऊ लागले असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. अहवाल निघाल्यानंतर ही संख्यादेखील कमी होईल. इतर जिल्ह्यातही ही रुग्णसंख्या वाढत गेली व ती खाली आली. आपल्याकडेही हाच ट्रेण्ड दिसून येत असून काही दिवसात रुग्णसंख्या कमी होईल. मात्र या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. तसे न झाल्यास प्रशासनातर्फे कारवाईदेखील केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मृत्युदर नियंत्रणात यश
सध्या रुग्णसंख्या अधिक येत असली तरी या काळात मृत्युदर कमी ठेवण्यास मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यात जे मृत्यू होत आहे, त्यात अधिक वय अथवा इतर आजार हे कारणे आहेत. मात्र गेल्या वर्षी मृत्यूचे जे प्रमाण होते, ते कमी झाले असून एक-एक मृत्यूदेखील रोखणे महत्त्वाचे आहे. लवकरच मृत्युदर दोन टक्क्यांच्याखाली येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाबंदी शक्य नाही
वाढत्या संसर्गामुळे पूर्ण लॉकडाऊनची मागणी काही जणांकडून होत आहे. मात्र त्याचे परिणाम सर्वच घटकावर होतात. त्यामुळे लॉकडाऊनची या काळात शक्यता कमीच असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या शिवाय जिल्हाबंदीची मागणी होत आहे. मात्र गेल्या वर्षाची स्थिती वेगळी होती, आता स्थिती वेगळी आहे. सध्या आपल्या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही संसर्ग असल्याने जिल्हाबंदी करून उपयोग होणार नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.