महाराज आपला मानबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:39 PM2018-02-27T12:39:15+5:302018-02-27T12:39:15+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘रंग संगती’ या सदरात अ‍ॅड.सुशील अत्रे यांचा विशेष लेख ‘महाराज आपला मानबिंदू’

Maharaj is your main point | महाराज आपला मानबिंदू

महाराज आपला मानबिंदू

googlenewsNext

हा लेख मी लिहीत आहे शिवजयंतीच्या शुभदिवशी. त्यामुळे चित्राचा विषय एकच- श्री शिवछत्रपती! या लेखासोबत महाराजांची दोन चित्रे दिली आहेत. महाराजांच्या हयातीत काढली गेलेली (आतापर्यंत सापडलेली) विश्वासार्ह अशी हीच दोन चित्रे आहेत. योगायोग कसा आहे, बघा- मराठी माणसाचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांची ही चित्रे काढली आहेत ती मात्र परकियांनी. कोणाही मराठी कलाकाराने, चित्रकाराने महाराजांचं चित्र काढलेलं दिसून आलेलं नाही; किंवा काढल्याचा उल्लेखसुद्धा कुठेही आढळून आलेला नाही. (त्या काळी!)
या चित्रांपैकी अश्वारूढ महाराज व त्यांचे सैनिक हे चित्र मीर महंमद या मुघल चित्रकाराने काढलं आहे. मिर्झाराजे जयसिंग इकडे दख्खनच्या स्वारीवर आले. त्या वेळी त्यांच्यासोबत निकोलाओ मनुची हा इटालियन माणूस होता. तो हरहुन्नरी होता. त्याने भारतातल्या सुमारे ५५-५६ राजे-रजवाड्यांची चित्रे मुद्दाम काढून घेतली होती. अश्वारूढ महाराजांचं चित्र मीर महंमदने या मनुचीसाठीच काढून दिलं होतं. ते पुरंदरच्या तहाच्या सुमारास काढलेलं आहे. बहुदा सन १६७२ साली ते काढलंय. ‘दखनी मिनिएचर पेंटिंग’ या चित्रशैलीत ते काढलेलं आहे. सोबत लवाजमा घेऊन महाराज घोड्यावरून जाताना (बहुदा कोणाच्यातरी भेटीला त्यात दाखवले आहेत. मनुचीने या चित्राचं पुढे काय केलं. त्याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही; पण सध्या हे मूळ चित्र पॅरिस येथील कलासंग्रहात आहे.
दुसरे चित्र हे शिवाजी महाराजांचे सगळ्यात प्रसिद्ध आहे. महाराजांचे अस्सल (मूळ) चित्र म्हणून त्याला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सध्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, शासनाच्या कागदपत्रांमध्ये हेच चित्र वापरलं जातं. पण आपण सध्या त्याची रंगीत प्रत सगळीकडे वापरतो. ती रंगीत प्रत ज्या चित्रावरून तयार केली. ते मूळ चित्र मात्र कृष्णधवल आहे. ते एका डच चित्रकाराने काढलं आहे. बहुदा ते, राज्याभिषेकानंतर महाराज दक्षिणेत कुतुबशहाच्या भेटीला गेले होते, त्या सुमारास काढलं असावं. ‘फ्रान्सवा व्हॅलेंटाईन’ या डच अधिकाºयाने भारतावरती लिहिलेल्या पुस्तकाच्या एका खंडात ते समाविष्ट आहे. हर्बर्ट-डी-जॅगर या डच चित्रकाराने ते काढलं होतं.  ज्येष्ठ इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांना सन १९१९ च्या आसपास सर्वप्रथम या चित्राचा शोध लागला. त्यांनी त्या काळी या चित्राचे छायाचित्र घेऊन ते प्रसिद्ध केले.
महाराष्ट्र सरकारने अधिकृत चित्र म्हणून ते स्वीकारलं खरं, पण त्याची फक्त फोटोप्रत आपल्याकडे उपलब्ध होती. अगदी अलीकडे. २०१६ साली पुण्याच्या मालोजीराव जगदाळे या इतिहासप्रेमी तरुणाने प्रचंड परिश्रम घेऊन, पदरचे पैसे खर्च करून हे मूळ कृष्णधवल चित्र डच संग्राहकाकडून विकत घेतले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कलासंग्रहालयाला हे चित्र सप्रेम भेट देण्याचा जगदाळेंचा इरादा आहे.
- अ‍ॅड.सुशील अत्रे

Web Title: Maharaj is your main point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव