Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 03:26 PM2019-10-09T15:26:37+5:302019-10-09T15:28:20+5:30
Maharashtra Election 2019 : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात एकत्र येणार असल्याचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात एकत्र येणार असल्याचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला चांगली माहिती असल्याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिले आहे.
शरद पवार म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असून मला माझ्या पक्षाची सध्याची स्थिती माहिती आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत. तसेच सुशीलकुमार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलू शकत नसल्याचे देखील शरद पवारांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सध्या जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागलेले असताना सोलपूरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचे विधान सुशालकुमार शिंदे यांनी केले होते. कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला होता.