शहरात आजपासून महास्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:19+5:302021-01-18T04:15:19+5:30
महापौर स्वतः करणार प्रत्येक प्रभागाची पाहणी : मनपाची संपूर्ण यंत्रणा लागणार कामाला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात अनेक ...
महापौर स्वतः करणार प्रत्येक प्रभागाची पाहणी : मनपाची संपूर्ण यंत्रणा लागणार कामाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात अनेक ठिकाणी घाणीचे ढीग साचले असून काही ठिकाणी अस्वच्छता वाढल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सोमवारपासून तीन दिवस विशेष महास्वच्छता अभियान हाती घेतले असून महापौरांनी रविवारी अभियानाचा आढावा घेतला.
शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कचरा संकलनासाठी वॉटरग्रेसला काम दिलेले आहे. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याची उचल केली जात नसून तो साचून असल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त झालेल्या होत्या. महापौर भारती सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, शहर अभियंता यांच्याशी चर्चा करून शहर स्वच्छतेसाठी महाअभियान राबविण्याचे निश्चित केले होते. महास्वच्छता अभियान शहरात तीन दिवस राबविण्यात येणार असून रविवारी महापौर भारती सोनवणे यांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला घेतला.
अमृत, भूमिगत गटारीच्या मक्तेदाराला सूचना
शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम सुरू असून चाऱ्या योग्यप्रकारे दुरुस्त न केल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. रस्त्यांमुळे साफसफाई होत नसल्याने नागरिकांची ओरड होत असून काम केलेल्या सर्व प्रभागातील चाऱ्या तातडीने बुजवून रस्त्यांची डागडुजी करावी अशा सूचना महापौरांनी मक्तेदाराच्या प्रतिनिधींना दिल्या.
तीन टप्प्यात स्वच्छता मोहीम
शहराचे स्वच्छता अभियानासाठी तीन भाग करण्यात आले असून एका दिवशी सहा प्रभागांचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. जळगाव महानगरपालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागातील सर्व मनुष्यबळ तसेच वाहने एकाच वेळी या अभियानात वापरले जाणार असल्याने संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाणार आहे.
महापौरांशी संपर्क साधावा
प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना महास्वच्छता अभियानाबाबत माहिती देण्यात आली आहे. सोमवारपासून अभियानाला सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी प्रभाग १ ते ६ ची स्वच्छता केली जाणार आहे. आपापल्या प्रभागातील तक्रारीबाबत नागरिकांनी महास्वछता अभियानादरम्यान महापौरांकडे तक्रार करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.