महायुतीच्या लाटेत खान्देशही चिंब; महाविकास आघाडीचा पुरता सफाया...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:46 PM2024-11-23T18:46:44+5:302024-11-23T18:46:52+5:30
केवळ एका जागेवरच यश, महायुतीला पाच जागांचा फायदा
ललित झांबरे
जळगाव: राज्यभर दिसून आलेल्या लाटेप्रमाणे खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतही महायुतीची लाट दिसून आली. त्यात महाविकास आघाडीचा पुरता सफाया झाला. विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच जळगाव व धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खातेसुद्धा उघडता आले नाही. खान्देशातील २० जागांपैकी केवळ नवापूरची जागा सोडली तर इतर १९ च्या १९ जागा महायुतीने जिंकल्या. नवापूरला काँग्रेसचे शिरिष सुरुपसिंग नाईक हे आमदारकी कायम राखण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे खान्देशात महाविकास आघाडीची भोपळ्याची नामुष्की टळली.
तीन लढती अटीतटीच्या
धुळे जिल्ह्यातील साक्री आणि नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व नवापूर येथील लढती अतिशय उत्कंठापूर्ण झाल्या. प्रत्येक फेरीगणिक या ठिकाणी पारडे इकडे किंवा तिकडे झकुत होते. अक्कलकुवा येथे पहिल्या १२ फेऱ्यांपर्यंत पहिल्या दोघातही नसलेल्या शिंदेसेनेच्या आमशा पाडवी यांनी शेवटी २७ फेऱ्यांअंती ३२८९ मतांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या ॲड. के.सी.पाडवी यांची मालिका खंडीत केली. साक्री मतदारसंघात शिंदेसेनेच्या यांनी अगदी शेवटच्या दोन फेऱ्यात बाजी पलटवली आणि १८ फेऱ्यांअखेर२८ हजाराच्या वर मतांनी आघाडीवर असलेल्या काँग्रेसच्या प्रवीण चौरे यांच्यावर ५८७६ मतांनी विजय मिळवला. नवापुरात अपक्ष शरद गावित यांनी शेवटपर्यंत झुंज कायम राखली. १८ व्या फेरीपर्यंत गावीत आघाडीवर आणि नाईक दुसऱ्या स्थानी होते पण १९ व्या फेरीत शिरीषकुमार नाईक यांनी आघाडी मिळवली आणि ती जेमतेम टिकवून ठेवत शेवटी फक्त ११२१ मतांनी त्यांनी विजय आपल्या नावावर लावला. त्यांच्या या विजयामुळे खान्देशात काँग्रेस व महाविकास आघाडीची एकमेव सीट आली.
चारही मंत्र्यांचा मोठा विजय
महायुतीने खान्देशात जिंकलेल्या १९ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ११, शिंदेसेनेने ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक जागा जिंकली आहे. २०१९ च्या तुलनेत खान्देशात महायुतीने पाच जागा अधिक कमावल्या आहेत. त्यात अक्कलकुवा, धुळे शहर, धुळे ग्रामीण, रावेर आणि मुक्ताईनगरचा समावेश आहे.
महायुतीच्या यशात त्यांचे चारही मंत्री, गिरीश महाजन, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील व अनिल भाईदास पाटील हे मोठ्या फरकाने विजयी झाले. गिरीश महाजन व डॉ. विजयकुमार गावीत यांनी सलग सातव्यांदा विजयी झेंडा फडकावला.
माजी मंत्री, माजी खासदारही पराभूत
माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी खासदार डॉ. हीना गावित, उन्मेष पाटील, ए.टी.पाटील, माजी आमदार ॲड.के.सी.पाडवी, अनिल गोटे, कुणाल पाटील, दिलीप वाघ, फारुक शाह, शिरीष चौधरी आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे व माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना पराभवाचा धक्का बसला.
चार जणांना पहिल्यांदाच आमदारकीचा मान
चार जणांना पहिल्यांदाच आमदारकीचा मान मिळाला आहे. त्यात भाजपच्या धुळे ग्रामीणचे राम भदाणे, रावेरचे अमोल जावळे, एरंडोलचे अमोल पाटील, धुळे शहरचे अनुप अग्रवाल यांचा समावेश आहे.
शिरपूरला विक्रमी मताधिक्क्याने विजय
शिरपूर मतदारसंघातून भाजपचे काशिराम वेचन पावरा हे तब्बल १ लाख ४५ हजार ९४४ मतांच्या विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले. त्यांना १ लाख ७८ हजार ७३ मते मिळाली तर दुसऱ्या स्थानावरील अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांना केवळ ३२ हजार १२९ मते मिळाली. यावेळच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी होण्याचा कदाचित हा विक्रम असावा.
नवापूरला निसटता विजय
याच्याउलट नवापूर मतदारसंघात झालेल्या अतिशय अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे शिरिषकुमार सुरुपसिंग नाईक हे फक्त ११२१ मतांनी विजयी झाले. अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी त्यांच्या नाकीनऊ आणले.