महिंदळे परिसरात अवकाळी पाऊस़, वादळाने पिके झाली आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 03:14 PM2021-01-07T15:14:35+5:302021-01-07T15:15:47+5:30
महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
महिंदळे ता. भडगाव : महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेली पिके जमीनदोस्त झाली. या पावसाने फुलोऱ्यावर असलेली बाजरी, ज्वारी, गहू, हरबरा दादर, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा पिक पूर्ण वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसाळ्यात कपाशीला बोन्ड अळीने खाल्ले आता रब्बीला अवकाळीचा दणका बसला आहे. यावर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरत आहे. पावसाळ्यात मेहनतीने शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून कपाशी फुलवली. अगोदर जास्त पाऊस झाल्यामुळे कपाशी पिक पार वाया गेले. जे शिल्लक होते त्यातही बोन्ड अळीचा कहर त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यावर येऊन ठेपले. पिकासाठी केलेला खर्चही निघाला नाही. कपाशीवर बोन्ड आली पडल्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारी कपाशी यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यातच उपटून फेकावी लागली. विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दादर, बाजरी, मका, गहू, हरबरा, टरबूज, ज्वारी पिकांची लागवड केली आहे. परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर बसत आहे. कधी वातावरण बदलाचा फटका पिकांना बसतो तर कधी अवकाळीचा मार निसर्गचक्रात मात्र शेतकरी पूर्ण अडकला आहे.
अवेळी आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. फुलोऱ्यात असलेली पिके जमिनीवर आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. एकाच रात्रीत होत्याचे नव्हते झाले.