रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने एक तास हजेरी लावली होती. या वादळामुळे अनेक ठिकाणी डेरेदार वृक्ष उन्मळून पडले. पारोळा - कासोदा रस्त्यावर के.आर. नगरमध्ये अनेक विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत, तर काही वाकले आहेत. यामुळे वीजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. खांब व वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच रस्त्यावर दशरथ महाजन यांच्या शेतातही अनेक झाडी उन्मळून पडली आहेत. शेतातच पोल्ट्रीफॉर्म होता. त्या शेडचेही पत्रे उडून दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. शेतगड्याच्या झोपडीचे पत्रे उडून ते कुटुंब उघड्यावर आले. संपूर्ण रात्र या कुटुंबाने उघड्यावर काढली. शेतकऱ्यांनी मका, ज्वारीचा चारा गुरांसाठी शेतात ढीग घालून रचून ठेवला होता. तदेखील दूरवर उडून गेला. शेतकऱ्यांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत मका, ज्वारी, बाजरी पावसाच्या पाण्यात भिजल्याने व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान झाले. पावसात भिजलेला माल वेगवेगळा करण्याचे काम व्यापारी मजुरांच्या साहाय्याने करताना दिसून आले.
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वाकलेले व जमीनदोस्त झालेले खांब दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करत होते. वादळात तुटलेला वाहिन्या उचलून त्या खांबावर चढविण्याचेही काम सुरू होते. २९ मे रोजी पारोळा शिवारात १८ मिमी, चोरवड शिवारात ३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.