लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोणतीही मागणी नसताना, कोणताही निकष नसताना किंवा ती यंत्रणा हाताळायला कोणताही तज्ज्ञ नसताना धरणगाव व चोपडा या ठिकाणी प्रत्येकी ४४ लाखांचे मेमोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्याचा मुद्दा माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी समोर आणला आहे. त्यातच या मशीनला हाताळायला कोणी नसून ती धूळखात पडली आहे, ती येथून हलवावी, असे पत्रच धरणगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण पाटील यांनी ३० जुलै रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे. त्यामुळे गरज नसताना इतके महागडे मशीन घेण्याचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न भोळे यांनी उपस्थित केला असून, याच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
डिजिटल मेमोग्राफी मशीन हे महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान तातडीने व अचूक करते, मात्र, हे मशीन एक तर उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी असणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधा अधिक बळकट करण्याची गरज आहे. असे असताना गरज नसताना, रुग्णांची तेवढी संख्या नसताना, या महागड्या मशिन्स गरज नसलेल्या ठिकाणी का घेतल्या गेल्या आहेत, याबाबत आता विचारणा केली जात आहे.
एकाही रुग्णची तपासणी नाही
धरणगाव येथील डिजिटल मेमोग्राफी मशीन हे एका कोपऱ्यात धूळखात पडून आहे. मशीन आल्यापासून त्याला इन्स्टॉल करायला चार महिन्यांचा अवधी लागला. इन्स्टॉल झाल्यानंतरही एकाही रुग्णाची तपासणी या मशीनवर झालेली नाही. या ठिकाणी तज्ज्ञच नसल्याने कोण हे मशीन वापरणार, असा प्रश्न येथील डॉक्टरांना आहे. अशा स्थितीत हे मशीन वापरायला तज्ज्ञ नाही, ते पडून पडून खराब होईल, त्यामुळे त्याला गरज असलेल्या ठिकाणी हलवा, असे पत्र डॉ.किरण पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांना दिलेले आहे.
...तर जबाबदारी प्रमुखाची
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिलेल्या बाबींची खरेदी करताना पुरवठा आदेश देण्यापूर्वी खरोखर किती साहित्याची आवश्यकता आहे. याचा आढावा कार्यालय प्रमुखांनी घ्यावा, खरेदी केलेल्या बाबी विनाकारण पडून राहणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखांची राहिले, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. मेमोग्राफी मशीनही गेल्या सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. याबाबत प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी दिनेश भोळे यांनी केली आहे.