ममुराबादला शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:12 AM2021-07-11T04:12:59+5:302021-07-11T04:12:59+5:30
जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद, ता. जळगाव : पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने पेरणीनंतर नुकत्याच उगवलेल्या कापसासह सोयाबीन, ...
जितेंद्र पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद, ता. जळगाव : पावसाचा अपेक्षित जोर नसल्याने पेरणीनंतर नुकत्याच उगवलेल्या कापसासह सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, मका यासारख्या खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडून कीड व रोगांना बळी पडत आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या केल्या. मात्र आता अपेक्षेनुसार पाऊस पडत नसल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेल्या पिकांची अवस्था नाजूक झाली आहे. पाऊस कुठे पडतो तर कुठे पडत नाही, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बियाण्याच्या उगवण शक्तीची अडचण आल्यामुळे आधीच अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. त्यात अलीकडे पावसाला अपेक्षित जोर नसल्याने दुबार पेरणीही वाया जाते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरम्यान, पावसाची वाट पाहून थकलेल्या अनेक शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्याचा वापर करून कोवळी पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचन प्रणालीचा वापर केला जात आहे. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांसमोर मात्र पावसाची वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आणखी काही दिवस चांगला पाऊस न झाल्यास संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
(कोट)...
पेरणीनंतर पाहिजे तसा पाऊस झालेला नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. उगवणशक्तीवर परिणाम झाला आहे. या पिकांपासून पुढे जाऊन जास्त उत्पादनाची आशाही आता मावळली आहे.
- चंद्रकांत पाटील, ममुराबाद
फोटो- ममुराबाद भागात पेरणीनंतर चांगला दमदार पाऊस पडलेला नसल्याने वाढ थांबलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरविण्यास सुरुवात केली आहे.