संचारबंदीमुळे विक्री घटल्याने आंब्याचे दरही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:30+5:302021-04-27T04:17:30+5:30
कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची ...
कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची आवक जोरात होती आणि विक्रीही जोरात होती. मात्र, संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळी अकरापर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी असल्यामुळे ग्राहक कमी होऊन, आब्यांची विक्री घटली आहे तसेच दरही घटले आहेत. संचारबंदीमुळे माल पडून असल्याने दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती शहरातील आंबा विक्रेत्या व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गेल्या एक महिन्यापासून आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, सध्या बाजारपेठेत रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, गुजरात केशर, कर्नाटक हापूस, बेंगन फल्ली, गुलाब खश आदी प्रकारचे आंबे विक्रीला आले आहेत. उन्हाळ्यातील या दिवसात आंबा विक्रीचा व्यवसाय जोरात असतो. बाहेरून मालाची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, याच दिवसात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने पुन्हा आंबा विक्रेत्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच फटका बसला आहे. संचारबंदीपूर्वी भरलेला माल आता संचारबंदी लागू झाल्याने विक्री होत नसल्याने अंगावर पडला आहे. यामुळे भांडवल अडकले असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच आंब्याची विक्री होत नसल्याने काही माल नाशवंत होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. सकाळी अकरापर्यंत ग्राहक खरेदीला येतात. मात्र, म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो:
पूर्वीप्रमाणे वेळ लागू करण्याची मागणी
शासनाने संचारबंदीत सकाळी सात ते अकरापर्यंत व्यवसायासाठी लागू केलेल्या वेळेत फारसा व्यवसाय होत नाही. त्यामुळे दुकानाचा दिवसभराचा खर्चही निघत नाही. त्यात लवकर माल विक्री होत नसल्याने, माल नाशवंत होऊन आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे व्यवसायाची सवलत देण्याची मागणीही या विक्रेत्यांतर्फे करण्यात येत आहे.
इन्फो :
सध्या संचारबंदीमुळे बाहेरून येणाऱ्या आंब्याची आवक कमी झाली असून, विक्रीही घटली आहे. तसेच सर्वप्रकारच्या आंब्याचे दरही कमी झाले आहेत. सद्यस्थितीत दुकाने उघडण्याची वेळ कमी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे.
- मौसीन पठाण, व्यावसायिका
शासनाने व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे गरजेचे आहे. तेव्हाच चांगला व्यवसाय होईल. सध्या दिलेली वेळ ही अपुरी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.
- इम्रान खान, व्यावसायिक